श्री दत्त अवतार

श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.


श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

http://www.shreegurudevdattamandirvakola.com/uploads/1/8/3/1/18311875/3348619_orig.jpg?116

ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.