गुरूचरित्र
गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.
गुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा
श्रीगणेशाय नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व झालें परियेसीं । गुरुचरित्र विस्तारेंसी । सांगतां संतोष होतसे ॥१॥
गाणगापुरीं असतां गुरु । ख्याति झाली अपरंपारु । भक्त होता एक शूद्रू । तयाची कथा ऐक पां ॥२॥
माध्यान्हकाळीं मठासी येता । पुनरपि चरणीं ठेवी माथा । ऐसे कितीएक दिवस होतां । शूद्राची भक्ति वाढली ॥५॥
श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उभे असती । येणें विधीं बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥६॥
तुझे मनीं काय वासना । सांग त्वरित आम्हां जाणा । शूद्र म्हणे आवड मना । शेत अधिक पिकावें ॥८॥
तयासी पुसती गुरुनाथ । काय पेरिलें शेतांत । शूद्र म्हणे यावनाळ बहुत । पीक आलें तुझे धर्मीं ॥९॥
नमस्कारितां तुम्हां नित्य । पीक आलें असे अत्यंत । पोटरीं येतील त्वरित । आतां तुझेनि धर्मीं जेवूं ॥१०॥
श्रीगुरु गेले शेतापासीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी । सांगेन एक ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१२॥
जें सांगेन मी तुजसी । जरी भक्तीनें अंगिकारिसी । तरीच सांगूं परियेसीं । एकभावें त्वां करावें ॥१३॥
शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी । दुसरा भाव आम्हांसी । नाहीं स्वामी म्हणे तो ॥१४॥
मग निरोपिती श्रीगुरु तयासी । आम्ही जातों संगमासी । परतोनि येऊं मध्यान्हासी । तंव कापावें सर्व पीक ॥१५॥
ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी । शूद्र विचारी मानसीं । गुरुवाक्य आपणा कारण ॥१६॥
शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत । खंडोनि द्यावें मला शेत । गत संवत्सराप्रमाणें धान्य देईन ॥१७॥
अधिकारी म्हणती तयासी । पीक झालें असे बहुवसीं । या कारणें उक्तें मागसी । अंगिकार न करिती ॥१८॥
नाना प्रकारें विनवी त्यांसी । द्विगुण देईन गतसंवत्सरेसी । अंगिकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहून घेती ॥१९॥
आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं । गेला शेतांत संतोषोनि । म्हणे कापा तयासी ॥२०॥
कापूं लागतां शेतासी । स्त्री-पुत्र वर्जिती तयासी । पाषाण घेऊनि स्त्रियेसी । मारुं आला तो शूद्र ॥२१॥
पुत्रातें मांरी येणेंपरी । पळत आले गांवाभीतरीं । आड पडतां राजद्वारीं । पिसें लागलें पतीसी ॥२२॥
पीक असे बहुवसी । कापून टाकितो मूर्खपणेंसी । वर्जितां पहा आम्हांसी । पाषाणघाईं मारिलें ॥२३॥
संन्याशाचें माहात्म्य वाचें बोले । पीक सर्व कोमळ कापिलें । आमुचें जीवित्व भाणास गेलें । आणिक भक्षितों एक मास आम्ही ॥२४॥
अधिकारी म्हणती तयासी । कापी ना का आपुल्या शेतासी । पत्र असे आम्हांपासीं । गतसंवत्सरा द्विगुण धान्य द्यावें ॥२५॥
वर्जावया माणसें पाठविती । शूद्र न ऐके कवणे गतीं । शूद्र म्हणे अधिकारी भीतीं । पेवीचे कण आतां देईन ॥२६॥
दूत सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें शूद्रासी । सांगोनि पाठविलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२७॥
जरी भितील अधिकारी । तरी देईन आतांचि घरीं । गुरें बांधीन तयांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२८॥
दूत सांगती ऐशा रीतीं । पुढें वर्तली काय स्थिति । राजा अधिकारी तयाप्रती । काय उत्तर बोलतसे ॥२९॥
अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता कायसी । पेव ठाउकें आहे आम्हांसी । धान्य आहे अपार ॥३०॥
इतुकें होतां शूद्रें देखा । पीक कापिलें मनःपूर्वका । उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥
नमन करोनि श्रीगुरुसी । शेत दाखविलें कापिलें ऐसी । श्रीगुरु म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥
विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापलें । शूद्र म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि मज कामधेनु ॥३३॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असे तुझे चित्तीं । होईल अत्यंत फळप्राप्ति । चिंता न करीं मानसीं ॥३४॥
ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत । सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥
शूद्र समस्तांतें संबोखी । न करीं चिंता रहा सुखी । गुरुसोय नेणती मूर्खी । कामधेनु वाक्य तयांचें ॥३७॥
गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैचें होय त्यासी । निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि शूद्र सांगतसे ॥३९॥
नर म्हणूं नये श्रीगुरुसी । शिवस्वरुप जाणा भरंवसीं । असे कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें असे मज ॥४०॥
समस्त राहिले निवांत । ऐसें आठ दिवस क्रमित । वायु झाला अति शीत । समस्त पिकें नासलीं ॥४२॥
समस्त ग्रामींची पिकें देखा । शीतें नासलीं सकळिका । पर्जन्य पडला अकाळिका । मूळ नक्षत्रीं परियेसा ॥४३॥
ग्राम राहिला पिकावीण । शूद्रशेत वाढलें शतगुणें । वाढला यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसी ॥४४॥
पीक झालें अत्यंत । देखोनिया समस्त । येऊनि जन समस्त तेथ । महदाश्चर्य करीत देखा ॥४६॥
येऊनि लागे पतिचरणीं । विनवीतसे कर जोडोनि । बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करीं म्हणतसे ॥४७॥
ऐसें पतीसी संबोधोनि । शेतींचा देव पूजोनि । विचार केला दोघांनीं । गुरुदर्शना जावें आतां ॥४९॥
म्हणोनि सांगे स्त्रियेसी । पूजों आलीं श्रीगुरुसी । स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनिया ॥५०॥
चरणीं लागलीं तेव्हां दोन्ही । हस्तद्वय जोडोनि । स्वामीदर्शन उल्हासोनि । उभीं ठाकलीं संमुख ॥५१॥
दोघेंजणें स्तोत्र करिती । जय जयाजी श्रीगुरुमूर्ती । कामधेनु कुळदैवत म्हणती । तूंचि आमुचा गुरुराया ॥५२॥
तुझें अमृतवचन आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा । पूर्ण केलें आमुच्या कामा । शरण आलों तुज आम्ही ॥५३॥
निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमीं जाण । करितां मास काळक्रमण । पीक आलें अपार ॥५६॥
गतसंवत्सराहूनि देखा । शतगुणी झालें धान्य अधिका । शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियातें बोलावोनि ॥५७॥
शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी । वोस दिसे कोठारासी । आपण देऊं अर्धा भाग ॥५८॥
गतवर्षा द्विगुण तुम्हांसी । अंगिकारिलें मीं परियेसीं । धान्य झालें बहुवसीं । शतगुणें अधिक देखा ॥५९॥
परी देईन अर्ध संतोषीं । संदेह न धरा हो मानसीं । अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवी करुं ॥६०॥
गुरुकृपा होतां तुजवरी । पीक झालें बहुतांपरी । नेऊनिया आपुले घरीं । राज्य करीं म्हणती तया ॥६१॥
संतोषोनि शूद्र देखा । विप्रासी वांटी धान्य अनेका । घेऊनि गेला सकळिका । राजधान्य देऊनि ॥६२॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं । दृढ भक्ति असे ज्यासी । दैन्य कैचें तया घरीं ॥६३॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥६५॥