भगवान श्रीकृष्ण

साने गुरुजींनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्णांचे चरित्र.


साधना 13

हा परमात्मा विश्वकर्मा आहे. याचा अर्थ हा की, सृष्टीच्या अनेकविध शक्तीत व रूपात तो प्रकट होतो. अन्तःकरणात त्याचा जो आविर्भाव होतो तो एकत्वरूपाने होतो. सृष्टीत पृथक्करणाने आपण सत्याचा शोध करतो. परंतु हृदयात सत्याची अनुभूती एकदम आणि प्रत्यक्ष येते. परमात्म्याला क्रमाक्रमाने मिळवायचे नसते. तुकड्यातुकड्यानी त्याला मिळवायचे नसते. तो अखंड आहे. हृदयाचे हृदय, अंतरात्म्याचा आंतरतम आत्मा या नात्यानेच त्याला जाणवायचे. प्रेमरूपाने, आनंदरूपानेच त्याची अनुभूती घ्यावयाची. अहंकार टाकून त्याच्यासमोर उभे राहताच त्याचे आंनदमय नि प्रेममय स्वरूप समजून येईल.

मानवी हृदयातून खोल निघालेली एक प्रार्थना प्राचीन औपनिषदिक वाङ्मयात आहे - “आविः आविर्मयेधि” - “हे स्वतःला प्रकट करणार्‍या तू स्वतःला प्रकट कर,’ अशी ही प्रार्थना आहे. आपण स्वार्थी असतो म्हणून दुःखी असतो. म्हणून आपल्याजवळ प्रकाश नसतो. स्वतःच्या बेसूर आवाजात आपण ओरडत असतो. अनंताचे दिव्य संगीत आपल्या हृदयतंत्रीतून स्रवत नाही. असमाधानी सुस्कारे, अपेशी जीवनाचा कंटाळा, भूतकालाबद्दलचा खोटा पश्चात्ताप, भविष्याबद्दलची नसती चिंता, इत्यादीमुळे आपली उथळ व क्षुद्र हृदये संत्रस्त असतात. आपण कोण, याची आपणाला जाणीव नसते. तो सर्वत्र प्रकट होणारा परमात्मा आपल्या हृदयात अजून प्रकट झालेला नसतो. आपण दीनवाणे होऊन म्हणतो -

रुद्र यत् ते दक्षिण मुखं
तेन मां पाहि नित्यम् ।
‘हे भीषण रुद्रा, तुझ्या प्रसन्न दृष्टीने मजकडे पाहा.’

आपला स्वार्थ म्हणजे आत्म्याला गुंडाळणारे कफन आहे. आपला स्वार्थ आत्मदेवाला मारतो, म्हणून आपली प्रार्थना असते -
असतो मा सत् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय॥

‘असत्याकडून मला सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूतून अमृतत्त्वाकडे ने’ परंतु ही प्रार्थना परिपूर्ण कशी व्हायची? कारण सत्य व असत्य, मृत्यू व अमृतत्व यात अफाट अंतर आहे. परंतु गंमत अशी आहे की, हे अफाट अंतर क्षणात तोडता येते. तो प्रकट होणारा हृदयात प्रकट होताच हे तीर व परतीर एकच होतात. सान्त व अनन्त तेथे भेटतात.

विश्वानि देव सवितर्
दुरितानि परा सुव॥

‘हे तेजस्वी तात, माझी सकल पापे दूर कर.’ पाप म्हणजे काय? स्वतःचे अनंत स्वरूप विसरून सान्त वस्तूशी जेव्हा जीव रमतो, तेव्हा पाप होते. क्षुद्रतेने अनंत आत्म्याचा केलेला तो पराजय असतो. हृदयाशी कवडी धरून लाल रत्न आपण झुगारून देतो, हे पाप. पाप सत्याला झाकोळून टाकते. आपण विषयामागे धावतो, भोगासाठी लाळ घोटतो. ते भोग का मोठे सुंदर असतात? आपल्या वासनांचा प्रकाश त्यांच्यावर पडून ते रमणीय व स्पृहणीय वाटतात. वस्तुतः त्या वस्तू, ते भोग पै किमतीचे. आपण त्यांना नसते महत्त्व देतो. तारतम्य राहात नाही. या क्षुद्र वस्तूंसाठी झगडतो, पदच्युत होतो. त्या अनंत परमात्म्याच्या प्रकाशात सकस वस्तूंचे तारतम्याने मोजमाप करायचे, सर्वत्र मेळ निर्माण करायचा, हे आपण विसरूनच जातो. पदोपदी मग आदळआपट, रडारड, अपयश. ईश्वरापासून आपण दूर आहोत असे वाटते, दुःख होते, आणि कळवळून आपण म्हणतो :