भगवान श्रीकृष्ण

साने गुरुजींनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्णांचे चरित्र.


भगवान श्रीकृष्ण 14

अशा त-हेने ही क्षरसृष्टी, ही माझ्या समोरची बदलणारी सृष्टी, जी मला सेवासाधने नित्य नवी देते, ती क्षरसृष्टी म्हणजेही पुरुष. मी पूजा करणारा, कर्म करणारा, जन्मोजन्मी सेवा करून न थकणारा मी -मीही पुरुष. आणि आम्हा दोघांना व्यापून असणारा परमात्मा तो परम पुरुष, तिन्ही पुरुष मिळून पुरुषोत्तमयोग होतो. कर्म, कर्माची साधने, कर्म करणारा व ज्याला कर्म अर्पावयाचे तो समाज, ते विश्व-सर्वत्र मंगल परमात्माच पाहावयाचा, म्हणजेच प्रत्येक कामात कर्म, ज्ञान, भक्ती ओतावयाची. कोणतेही कर्म असो-ते या तिन्हीमिळून पूर्ण आहे. नाही तर ते साङ्ग नाही. संपूर्ण नाही. कर्म, ज्ञान, भक्ती ही निरनिराळी नाहीत. एकाच घराचे हे तीन मजले आहेत. तीन पदरांचे हे एकच जानवे, एकच यज्ञोपवीत आहे. यज्ञोपवीताचे तीन पदर निरनिराळे अलग नसतात, तर त्यांची न सुटणारी, न तुटणारी अभेद्य गाठ बांधलेली असते. त्या गाठीला आपण ब्रह्मगाठ म्हणतो. कर्म, ज्ञान आणि भक्ती एकत्र कराल, प्रत्येक कर्मात या तिन्ही गोष्टी ओताल, तेव्हा ब्रह्मगाठ लाभेल, ब्रह्माची भेट घडेल, आनंदाची प्राप्ती होईल, तोपर्यंत नाही. साधनांसहित वाढणारे पवित्र कर्म; ते ज्याला अर्पावयाचे तो परमेश्वर आहे ही भावना, हे ज्ञान आणि कर्म  या भगवंताला अर्पण करावयाचे आहे. हा जो जिव्हाळा, ते कर्म करण्यापासून तो अर्पीपर्यंत, हृदयात असते ती भक्ती-अशा रीतीने कर्म, ज्ञान, भक्ती, यांचा मिलाफ करायला गीता सांगत आहे. गंगा, यमुना, सरस्वतीचा महापावन त्रिवेणी संगम करायला सांगत आहे. कर्म व ज्ञान यांच्यामधला दुवा म्हणजे भक्ती. कर्माला ज्ञानाशी जोडणारा जिव्हाळा म्हणजे भक्ती.

मुक्तीचा संदेश
अशा त-हेने कर्म करावयास योगेश्वर कृष्ण सांगत आहे. त्या श्रीकृष्णालाच हा उपदेश करावयाचा अधिकार होता. त्याला कोणतेही कार्य पवित्र वाटे. राजसूय यज्ञाच्या वेळेस धर्मराजाने सर्वांना कामे वाटून दिली. श्रीकृष्णाला काम उरलेच नाही. श्रीकृष्ण धर्माला म्हणाला, ''मला योग्य असे काम राहिले आहे. सर्व मंडळी जसजशी उठतील, तसतशी मी उष्टी उचलून शेण लावीन. मी गवळयाचा मुलगा. शेणाची घाण मला वाटत नाही. शेण पवित्र आहे, मला ते आवडते. मी आनंदाने शेणगोळा फिरवीन.'' राजसूय यज्ञात अग्रपूजा कोणाची करावी याची चर्चा तिकडे शिशुपाल, भीष्म, दुर्योधन यांत चालली असता हा श्रीकृष्ण, शेण लावण्यात दंग होता ! त्याचा आनंद त्या कर्मात होता. दुस-या मानपानाची कल्पनाही त्याच्या मनात नव्हती. असा श्रीकृष्ण, गायी चारणारा, घोडे हाकणारा, शेण लावणारा. तो सांगत आहे की, कर्म पवित्र आहे; ते उत्कृष्टपणे करा म्हणजे तुम्ही मुक्त आहात.