महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र


महात्मा गौतम बुद्ध : || तीन || 3

जन्ममरणातून मुक्त होण्याचे नानाविध प्रकार व मार्ग त्या काळी कल्पिलेले दिसतात. त्यातील चार स्पष्टपणे उमटून पडतात.

१)वैदिक सुक्ते उदघोषितात, की ईश्वरी कृपा प्राप्त करून घेण्याची सर्वोत्तम साधने म्हणजे प्रार्थना व पूजा. २) प्रथम प्रथम देवतांना साधा हविर्भाग देण्यात येत असे. त्यातून पुढे यज्ञमागांची विशाल प्रक्रिया जन्माला आली. हे यज्ञयाग लोकप्रिय झाले. उपनिषत्पूर्वकाळी हे यज्ञयाग फार गुंतागुंतीचे झाले होते. उपनिषदांनी सांगितले, की हे यज्ञयाग अपुरे आहेत. एवढ्याने भागणार नाही. तरीपण उपनिषदांनी यज्ञयागांचा पूर्णपणे धिक्कार केला नाही. ऐहिक सुखप्राप्तीचा तो एक उपाय आहे, अमृतत्वही त्यामुळे मिळेल. आणि या दृष्टीने यज्ञयाग उपयुक्त, असे उपनिषदे सांगतात.  ३) काही पंथांमध्ये संन्यासधर्म प्रिय होता. संयम, पावित्र्य, ध्यानध्रणा, एकाग्रता, मनोनिग्रह इत्यादी साधनांनी मनुष्य विचारशक्ती व इच्छाशक्ती वाढवू शकतो. संन्यासमार्गाचे पुरस्कर्ते पुढे फसून दुस-याच फंदात पडले. इच्छा दडपून, स्वेच्छेने देहदंड सोसून मनुष्य ऋद्धीसिद्धी मिळवितो, अतिमानुषी अशी अलौकिक शक्ती मिळवितो, असे समजण्यात येऊ लागले. यज्ञापेक्षा तप श्रेष्ठ आहे, ब्रह्मज्ञान मिळविण्याचे ते महान साधन आहे, असे सांगण्यात येऊ लागले. ४) उपनिषदे विद्येवर भर देतात, अंतर्ज्ञानावर भर देतात, जे सत्य आहे त्याच्या साक्षात्कारावर भर देतात. वासनाविजय करावा, सांसारिक बंधने व स्वार्थ यांच्यापासून दूर असावे, अनासक्त राहावे. ज्ञानाला या सर्व गोष्टींची जोड हवी. विद्या म्हणजे एकाग्रता, एक प्रकारची तन्मयता, अखंड समाधी, हे गाढ चिंतन असते; परमात्म्याशी स्वत:च्या ऐक्याचा तो साक्षात्कार असतो. त्या अनुभूतीने सारी ऐहिक आसक्ती गळून जाते; सारे बंध तुटतात. असे हे चतुर्विध मागे होते. बुद्ध आत्यंतिकता टाळतात. त्यांचा ‘मध्यम मार्ग’ आहे. देहाची पूजा व देहदंडना यांच्यातील मधला मार्ग त्यांचा आहे. बुद्धांचा दृष्टीकोण चौथ्या प्रकाराशी जुळता आहे. त्यांची शिकवण उपनिषदांतूनच निघालेली आहे. उपनिषदांचे असे मत आहे, की जे जग आपण जाणतो, ते जग-मग ते बाह्य असो वा आंतरिक असो, फारसे महत्त्वाचे नाही. या जगाला सत्यता नाही. खरी पारमार्थिक सत्यता द्रष्ट्या आत्म्याला आहे. सर्व आत्म्यांचा तो आत्मा आहे. ब्रह्म व हा आत्मा एकच आहेत. या परमोच्च सत्याचे ज्ञान, जीवात्म्याचे परमात्म्याशी हे ऐक्य व त्याचा साक्षात्कार म्हणजे मोक्ष. ही एक जीवनदशा आहे. कोठे जायचे-यायचे नाही. विश्रांती घेण्याचे हे एखादे स्थान नाही. जीवनाचा हा एक विशेष गुण आहे. आध्यात्मिक शिकवणीने, व्रतनियमांनी, आध्यात्मिक प्रकाशाने हा गुण, ही मुक्तदशा अंगी येते. हे ध्येय लाभेपर्यंत मनुष्य कर्माने बद्ध आहे. तोपर्यंत ‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं’ आहे.