महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र


महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 1

।।दोन।।

बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यांत शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध जीवन आखले पाहिजे. कशाचाही अतिरेक असता कामा नये. अति देहदंड नको किंवा देहाचे फाजिल लाडही नकोत; मधला मार्ग घ्यावा, असे प्रवचनाच्या आरंभी सांगून दु:खासंबंधीची चार सत्ये त्यांनी सांगितली आहेत. आणि नंतर दु:खनिरसनाचा उपाय त्यांनी सांगितला आहे.

१) जनन म्हणजे दु:ख; मरण म्हणजे दु:ख; रोग म्हणजे दु:ख; अप्रियाची प्राप्ती म्हणजे दु:ख; प्रिय वस्तूचा वियोग म्हणजे दु:ख. जननमरण, रागद्वेष या विश्वव्यापक गोष्टी आहेत. त्या सर्वत्र आहेत, सदैव आहेत. जीवनात मेळ नसून विसंवादपणा आहे, त्यांच्या त्या खुणा आहेत. मनुष्याच्या दु:खाच्या मुळाशी विरोध आहे, झगडा आहे. आपल्या अध्यात्मिक रोगाच्या मुळाशी स्पर्धा असते. या यर्व क्षणिक व अशाश्वत जगात, या दृष्य पसा-यात  हा झगडा सर्वत्र भरुन राहिला आहे. आशा या विरोधातून सुटका करुन घेणे शक्य आहे व सुटका करुन घेतलीच पाहिजे.


२) प्रत्येक वस्तूला कारण असते; प्रत्येक वस्तूचा परिणामही घडतो; हे साधे तत्त्व या सर्व विश्वात भरुन राहीलेले आहे. देव व मानव स्वर्ग व पृथ्वी या सर्वांचा व्यवहार या एका तत्त्वानुसार चालला आहे. अमर्याद अवकाशात पसरलेले जे हे अनंत विश्व, या विश्वातील या अनंत ग्रहमाला, ही अनंत ब्रह्मांडे, आणि ह्यात पदोपदी होणारे हे फेरबदल, यांनाच केवळ कार्यकारणभावाचा कायदा लागू आहे असे नाही; तर मानवी जीवनात, ऐतिहासिक घटनांतही हाच कायदा कार्य करीत आहे असे दिसून येईल. दु:खाचे मूळ शोधून तेच जर उपटून टाकले गेले, तर दु:ख आपोआपच नाहीसे होईल. दु:खचे मूळ कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे जगण्याची धडपड, जीवनाची हाव. कार्यकारणभावाच्या साखळीचे बारा दुवे यानंतर सांगण्यात आले आहेत व तेथे या गोष्टीचा अधिक विस्तार करण्यात आला आहे. अज्ञान व तृष्णा एकत्र बांधलेली आहेत, एकाच घटनेची तात्त्विक व व्यवहारिक अशी ही दोन रूपे आहेत. अज्ञानामुळे जीवनात बिघाड उत्पन्न होतो. जीवनातील सर्वांगीण व्यवस्थेत भंग होतो. हे ज्ञान अतिरेकी व्यक्तिवादाच्या रूपाने प्रकट होते, स्वत:ला जगापासून अलग करण्याच्या रूपाने प्रकट होते, जगातील सुसंवादित्याविरुद्ध बंड करण्याच्या रूपाने ते प्रकट होते. आणि त्यामुळे मग नानाविध वासना जन्मतात. अनेक प्रकारची हाव सुटते.