महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र


आवाहन 2

आवाहन

(अनुवादक  :  आचार्य स. ज. भागवत)

१.
पृथ्वी हिंसेने उन्मत्त झाली आहे. निष्ठिर द्वद्वे नित्य माजत आहेत. जीवनाचा पंथ भयंकर कुटिल झाला असून लोभाच्या जटिल बंधनांनी जखडला गेला आहे. भगवन्! आपल्या नूतन जन्मासाठी सर्व प्राणी आतुर झाले आहेत. हे महाप्राण! सकलांचे रक्षण करा. आपली अमृतवाणी ऐकवा आणि अखंड मधुनिष्यन्द करणारे प्रेमपद्म येथील जीवनात विकसित करा. अहो शांत, मुक्त, अनंतपुण्य, करुणाघन बुद्धदेव! हे धरणीतल कलंकरहित करा!

२.

हे दानवीर! या. पृथ्वीला त्यागाची कठिण दीक्षा द्या. हे महाभिक्षो! सर्व लोकांपासून अहंकाराची भिक्षा घेऊन त्यांना निरहंकार बनवा. सर्व लोकांना आपल्या शोकाचा विसर पडो. त्यांच्या मोहाचे खंडन करा. ज्ञानसूर्याचा उदय-समारंभ उज्ज्वलतेने होऊ द्या. सकल भुवनाला प्राणसामर्थ्य लाभो. अंध झालेल्यांना जीवनाचे नेत्र लाभोत. अहो शांत, मुक्त, अनंतपुण्य, करुणाघन बुद्धदेव! हे धरणीतल कलंकरहित करा!

३.
दु:खाने प्रदीप्त झाल्यामुळे पृथ्वीवरील निखिल हृदये आक्रंदन करीत आहेत. विषय-विषाच्या विकाराने ती जीर्ण, खिन्न आणि अपरितृप्त झाली आहेत. देशादेशांनी आपल्या भाळी रक्ताचा तिलक लाविला आहे आणि सर्वांच्या मुखावर पापाची ग्लानी पसरली आहे. आपला मंगल शंख आणा. आपला दक्षिण हस्त अनुग्रहासाठी पुढे करा. आपल्या शुभ संगीताचे राग आळवा आणि आपला सुंदर छंद जीवनाला अर्पण करा. अहो शांत, मुक्त, अनंतपुण्य, करुणाघन बुद्धदेव! हे धरणीतल कलंकरहित करा!