अष्टविनायक

गणपतीची आठ अतिप्राचीन मंदिरे, जिथे वसले आहेत स्वयंभू गणपती बाप्पा..!!


श्री मोरेश्वर


हे मंदिर पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. मोरगाव हे गणपतीच्या पूजेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. मोरेश्वर मंदिराच्या चारही कोपऱ्यात स्तंभ आहेत आणि मोठ्या दगडांच्या भिंती आहेत. इथे चार दरवाजे आहेत. हे चार दरवाजे चारी युगं, म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीक आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी भगवान शिवाचे वाहन नंदीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. या नंदीच्या मूर्तीचे तोंड गणेश मूर्तीच्या दिशेला आहे. नंदीच्या मूर्तीशी संबंधित इथे असलेल्या दन्तकथांप्रमाणे फार वर्षांपूर्वी भगवान शंकर आणि नंदी या मंदिरात विश्रांतीसाठी थांबले होते, परंतु नंतर नंदीने इथून जाण्यास नकार दिला. तेव्हापासून नंदी इथेच वास्तव्यास आहे. नंदी आणि उंदीर, दोघेही मंदिराच्या रक्षकाच्या रुपात तैनात आहेत. या मंदिरात गणपती बैठ्या अवस्थेत विराजमान आहे. त्याची सोंड डाव्या हाताला वळलेली आहे, त्याच्या चार भूजा आहेत आणि तीन नेत्र आहेत.
लोकांची श्रद्धा अशी आहे की या मंदिरात भगवान गणपतींनी सिंधुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. गणपतीने मोरावर आरूढ होऊन सिंधुरासुराशी युद्ध केले होते. म्हणूनच इथे वसलेल्या गणपतीला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे नामकरण आहे.