सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 121

''माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाहीं. तरीहि आपण भाऊच आहोंत. आपण सारे भाई भाई आहोंत. आमच्या झेंड्याखालचे लोक एकमेकांस भाई वसंता दिवसभर भटकत होता. भाऊ भेटल्यामुळे त्यांचे पोट भरून आलें होते. त्याला आनंद होत होता. टेंकडीवर जाऊन तो कुदला. झाडावर वानराप्रमाणे तो खेळत राहिला. त्याला कशाचेंहि भान नव्हतें. त्याला ऊन लागत नव्हते. त्यांचे पाय भाजत नव्हते. वीस वर्षांनी भाऊ भेटला या आनंदात तो होता.

सायंकाळ झाली. फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर तों बसला होता. एकटाच बसला होता. आपल्याला रात्रीं जावयाचें आहे . मारुतीसमोर बोलायाचें आहे . त्याला एकदम आठवण झाली. विचाराने मी भाऊ नाही ठरलों तर ? चिन्मय नातें बौध्दिक नाते नाही जडलें तर ? जगांत केवळ का बुध्दि सत्य आहे ? या हृदयाच्या हांका, या हृदयाच्या  भुका, ह्या का असत्य, मिथ्या ? मनुष्याच्या डोक्यालाच तेंवढें महत्त्व आणि हृदयाला नाहीं का ? परंतु शुध्द बुध्दि व शुध्द हृदय यांत भेद उत्पन्न होणारच नाही. शुध्द भावना व शुध्द विचार हीं अविरोधच असणार, एकरुपच असणार! कापराला पाठपोट का आहे ? जेथे खरी सत्यता आहे, तेंथे अंतर्बाह्य नातीं एकरुप असणार, हो असणार !

वसंता निघाला. उशीर होऊं नये म्हणून निघाला. पळत निघाला. वार्‍या प्रमाणें तो निघाला. आला ओंकारेश्वराजवळ. मारुतीच्या भोंवतीं लहान लहान सोंन्यामारुति बसले होते. त्यांच्यांत तो तेजस्वी भाऊ उभा होता. वसंतानें त्याच्याकडे पाहीले. वसंताच्या स्फूर्तीला पल्लव फुटले, हृदयाला पाझर फुटले. वसंता बोलावयास उभा राहीला. तो हृदय ओतीत होता, का बुध्दि ओतीत होता ? हृदयाच्या रसांत रंगवून बुध्दि ओतीत होता, व बुध्दित बुडवून हृदय ओतीत होता. ती मुलें तन्मय झाली होती. पिंपळाचीं सदैव नाचणारीं हालणारीं चंचल पाने, तींही स्थिर राहून ऐकत होती.

वेळ किती झाला कोणाला कळेना. सारे दिक्कालातीत वातावरणांत होते. केवळ अनंताच्या वातावरणांत सारे होते. अनंत भावना व अनंत विचार! अनंत सोन्यामारुतींची दर्शने! वसंता विचारांच्या व भावनांच्या कुंचल्यांनीं भराभरा जळजळीत चित्रे दाखवीत होता. मुलें कधीं डोळे मिठीत, डोळे वटारीत. कधीं त्यांच्या मुठी वळत, कधीं अश्रु गळत.

थांबला. वसंता थांबला. भाऊ धावत येऊन वसंताला मिठी मारता झाला. ''आपण दोघे भाऊ. पूर्वींचे एका आईच्या पोटचे भाऊ व आतांचे विचारानें भाऊ.'' तो म्हणाला.

''पण मी वैचारिक भाऊ शोभेन का ? मीं वाचलें नाही, अभ्यासिलें नाही. माझ्याजवळ हृदय आहे, बुध्दि नाही. वाचण्याचा मला उत्साह नाही. वैचारिक प्रक्रिया, नवीन नवीन दर्शनें अभ्यासण्याला मजजवळ जिज्ञासा नाही. भाऊ! तुझा हात मी हातांत घेऊ का ?'' वसंताने विचारलें.