सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 118

वसंता : अडाणी जातींत स्त्रियांचे जास्तच हाल होत असतील नाहीं ?

वेदपुरुष : सुसंस्कृतहि कांही कमी नाहींत. चांगले शिकले सवरलेले लोकहि पत्नीवर बडगा उगारतात. विलायतेंत जाऊन स्त्रीदाक्षिण्य शिकून आलेलेहि स्वत:च्या पत्नीस मारतात! पशू बेटे !

वसंता : कां बरें हे मारतात ? अपराधासाठीं मारतात का ?

वेदपुरुष
: लहर म्हणून मारतात आणि कांहीं लोक कामुकतेची तृप्ति होण्यासाठीं म्हणूनहि मारतात. ''नका ना मारूं, खरेंच नका हो! असें काय करतां ?'' असे पत्नीचे ते करुण उद्गार. ते तिचे हावभाव-तें सारें पाहण्यांत, अनुभविण्यांत, पतीची एक विशिष्ट कामुकता तृप्त होत असते. याला लाथाळें प्रेम किंवा गर्दभी प्रेम अशी संज्ञा आहे. असे हे पशू पत्नीला मारतां मारतां मग एकदम तिला मुक्यांनीं गुदमरवून टाकतात !

वसंता : समाजांतील ही विराट् घाण कशी जावयाची ? हें सारें जगत् कसें सुधारावयाचें ?

वेदपुरुष
: या गोष्टी चुटकीसरशा होणार नाहींत. परंतु प्रखरतेनें ही सारीं दु:खे, हा सारा चावटपणा, हा सारा छळवाद, ही पिळवणूक गाडून टाकण्यास तुम्हीं तडफडून उठलें पाहिजे. जळणारे आगीचे लोळ व्हावं सारें खळमळ जाळून टाका. उठा सारे, उठा सारे तरूण. ज्याला ज्याला हृदय व बुध्दि म्हणून कांही असेल त्यानें त्यानें उठलें पाहिजे आणि भांडलें पाहिजे. पिळले जाणारे शेतकरी, भरडले जाणारे मजूर, मारले जाणारे हरिजन यांना कोण मुक्त करणार ? स्त्रियांचे अपार अश्रु कोण पुसणार ? मुलांची मारलीं जाणारीं मनें कोण वाचंविणार ? नरकासारखे तुरुंग कोण सुधारणार ? रूढि कोण पुरणार ? भंगी, झाडू, सारे श्रमजीवी वर्ग यांची हायहाय कोण दूर करणार ? कोण त्यांना पुरेसं चांगलें खायला देणार, रहायला स्वच्छ घर देणार, अंगावर घालायला नीट कपडा देणार, थंडींत पांघरूण देणार, उन्हांत पायतण देणार, पावसांत घोंगडी-छत्री देणार ? कोण त्यांना ज्ञान देणार, विचार देणार, करमणूक देणार, कला देणार ? छापखाने, हॉटेलें, खानावळी-एक का दोन? जेथें जेथें मजूर आहेत तेथें तेथें दु:खें आहेत. अपार विपत्ति व अनन्त अन्याय आहेत, सर्वत्र उपासमार व बेकारी, अन्याय व अपमान! येऊं दे, त्याची चीड येऊं दे! आपण माणसें असून आपल्या कोट्यवधिं भावांबहिणींस आपण कीड-मुंगीप्रमाणें चिरडीत आहोंत याची शरम वाटूं दे, खंत वाटूं दे. हिदुस्थानांत कोट्यवधि लहान लहान जीर्णशीर्ण शेणामातीच्या झोंपड्या आहेत. तेथे हवा नाहीं, प्रकाश नाहीं, ज्ञान नाहीं, अन्न नाहीं, वस्त्र नाहीं. दहा दहा वीस वीस जीव वीतभर जागेंत कबुतरांसारखे नांदत आहेत. खेड्यांतून गांवठाणाच्या बाहेर सरकार घरें बांधूं देत नाहीं. त्यामुळें वेगळे होणारे भाऊबंद खरोखरच बिळांत उंदीर राहतात त्याप्रमाणें तेवढ्याच त्या परंपरेनें आलेल्या घरांत नांदतात! अन्याय! सर्वत्र अन्याय! वसंता! या ज्या अशा निरानंद, निर्जीव, निरुत्साह, नि:प्रकाश झोंपडया-यांतून कोट्यवधि देवाचीं लेकरें राहात आहेत. हीं खरीं सोन्यामारुतीचीं मंगल मंदिरें! हे पडलेले लाखों जीव, यांच्यात मारुतीप्रमाणें बुध्दिमान होण्याची, आकाशांतील सूर्याला बचकेंत धरण्यासाठीं उवण मारण्याची शक्ति आहे. हे पडलेले जीव दशमुखी शतमुखी रावणांना भारी होतींल. त्यांचीं साम्राज्यें मोडून तोडून फेंकून देतील. ही तुम्हांला माकडें वाटत आहेत. परंतु या माकडांतून जगद्वंद्य सोन्यामारुति निर्माण होण्याची सुप्त शक्ति आहे. त्यांच्यावरचीं दडपणें काढा, त्यांच्या विकासांतील अडथळे दूर करा. हे पडलेले जीव परब्रह्माप्रमाणें शोभूं लागतील.