सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 96

वेदपुरुष : यावरून सरकार व समाज यांची योग्यता कळते. इंग्रजांच्या देशांत बर्फ म्हणून एक विचारवंत लेखक होऊन गेला. तो पुराणमतवादी होता. परंतु अगदींच अनुदारहि नव्हता. त्यानें सरकार चांगलें आहे कीं नाहीं हें अजमावण्याच्या कांहीं खुणा सांगितल्या आहेत.

१ लोकांची आयुर्मर्यादा किती आहे.
२जननमरण संख्या किती आहे.
३ माणशीं उत्पन्न किती आहे.

या कसोट्या लावल्या तर सध्यांचे येथील सरकार दीडशें वर्षांपूर्वी झालेल्या थोड्याशा प्रतिगामी विचारसरणीच्या बर्कच्याहि मतें नालायक ठरेल! मग आजचे साम्यवादी अर्थशास्त्रज्ञ व पंडित या सरकारला काय म्हणतील त्याची कल्पनाच करावी.

वसंता : या देशांतील सरासरी आयुर्मर्यादा बावीस आहे. माणशीं सरासरी उत्पत्र दिवसांचे दीड आणा आहे. आणि तीन वर्षाच्या आंतील हजारों मुलें रोज मरत आहेत.

वेदपुरुष : एका पुणें शहरांत तीन वर्षाच्या आंतील दोन-तीनशें मुलें आठवड्याला मरत असतात! मृत्यूला भारतवर्षात कोवळया कोवळया मुलांची केवढी मोठी मेजवानी !

वसंता : आपण त्यांचें बोलणें ऐकूं या.

एक रोगी : काय बाबा सांगूं तुला ? त्या मानमोडीची मनांत कल्पना येताच अंगावर कांटा येतो बघ! पुण्यांत रोज अडीचशें माणसें मरत.

दुसरा रोगी : आणि मुंबईला रोजचा जवळजवळ हजारांचा आंकडा असे.

पहिला रोगी : त्या मानमोडींत कांहींचा फायदा झाला. डॉक्टर, भटजी, लांकडांचे वखारवाले व कावळे यांचा मोसम जोरांत चालू होता. आमच्या शेजारीं एक मनुष्य राहात असे. छापखान्यांत तो काम करी. पगार अठरा रुपये. त्याची बायको मानमोडींत सांपडली.

दुसरा रोगी : गर्भार बायका मानमोडींत हटकून मरत. त्या कांहीं बर्‍या होत नसत.