सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 95

वेदपुरुष : हो. मोठा ग्रंथकार होऊन गेला. अर्वाचीन रशियन वाङमयाचा जनक आहे तो. त्यानें एक सुंदर गोष्ट लिहिली आहे. एकदां उन्हाळ्यांत कोरडा असणारा एक ओढा पावसाळ्यांत खूप फुगला. त्याला गर्व झाला. त्यानें आजूबाजूचीं शेतें धुऊंन नेलीं. त्या शेतांची हिरवीं हिरवीं वस्त्रें सारीं गेलीं. त्या शेताना त्या वस्त्रहरणाचा राग आला. तीं शेतें फिर्याद करण्यासाठीं नदीकडे गेलीं! तों नदी फारच बेफाम दिसली! गांवेंच्या गांवें ती धुऊन नेत होती! गर्जना करीत होती! ती शेंतें कांहीं न बोलतां माघारीं गेलीं !

वसंता : किती सुंदर गोष्ट! खालच्यासंबंधीं तक्रार वरिष्ठांकडे न्यावी, तर वरिष्ठ अधिकच लुटारू, अधिकच पिळणारा! खालच्यांचे पांच रुपये, तर वरच्याचे दहा रुपये !

वेदपुरुष
: तीं कोष्टकें ठरलेलीं असतात. कोणीं किती घ्यायचें, त्याचे अलिखित कायदे आहेत; त्यासंबंधीं रूढी ठरलेल्या आहेत; पवित्र परंपरा प्रत्येक क्षेत्रांत स्थापन झालेल्या आहेत !

वसंता : ते रोगी कांहीं तरी जुन्या गोष्टी सांगत आहेत !

वेदपुरुष : सांगत बसतात सुखदु:खें.

वसंता : येथें फोनो, रेडियो वगैरे पाहिजेत, नाहीं ? रोग्यांचें मन प्रसत्र राहील असें केलें पाहिजे. नाहींतर रोगी स्वत:ची दु:खेंच उगाळीत बसतील !

वेदपुरुष : तो मानमोडीच्या काळांतील कथा सांगत आहे.

वसंता : मानमोडी म्हणजे काय ?

वेदपुरुष : त्याला इन्फ्लुएंझा म्हणतात. परंतु प्रतिभावान् गोरगरिबांनीं त्याला मानमोडी हें अर्थपूर्ण नांव दिलें आहे.

वसंता : ही सांथ कधीं आली होती ?

वेदपुरुष : झालीं वीस वर्षे. त्या वेळेस हिंदुस्थानांत साठ लाख माणसें मेलीं !

वसंता : मग आजारी किती पडलीं असतील ?

वेदपुरुष : सहा कोटी आजारी पडले असतील !

वसंता : एक-पंचमांश हिंदुस्थान रुग्णशय्येवर होता !