सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 93

डॉक्टर : ती होणारच. सध्यां उन्हाळा आहे. सोन्यामारुति पेटला आहे. मुलें हंसतात! डॉक्टरहि मंदमधुर स्मित करतात! त्यांना वाटलें कीं केवढा आत्रेय विनोद केला !

एक मुलगा : तें दुसरें नवीन औषध देऊन पहावें.

डॉक्टर : त्या टॅब्लेट्स ?

तो मुलगा : हो.

डॉक्टर : हरकत नाहीं. देऊन पाहूं. प्रयोग तर होईल.

दुसरा मुलगा : तें इंजेक्शन दिलें तर ?

डॉक्टर : तें एवढ्यांत नको. पुढें पाहूं.

वसंता : गरीब रोगी म्हणजे ज्ञानप्रकाशाचीं साधनें आहेत !

वेदपुरुष : आधीं कुत्रे, ससे, उंदीर, गाई, बेडूक, घोडे, यांच्यावर प्रयोग करण्यांत येतात. त्यांना औषधें देतात, टोंचतात, परीक्षण करतात. ते प्रयोग यशस्वी झाले म्हणजे मग ईश्वराच्या लाडक्या मानवजातीवर त्याचे प्रयोग सुरू होतात. परंतु मानवजातींतहि आधीं भिकारी, कैदी, हमाल, मजूर, गोरगरीब यांजवर सुरु होतात. आणि अशा रीतीनें ही दया यशस्वी होत होत मग शेवटीं माड्यामहालांत-बंगल्यांत शिरते.

वसंता : या गरिबांच्या प्राणांना कांहींच किंमत नाहीं ?

वेदपुरुष
: देवाघरीं आहे. देवाच्या घरीं हे ज्ञानासाठीं झालेले हुतात्मे म्हणून गौरविण्यांत येतात. जगांतील आयुर्वेद वाढावा, शस्त्रक्रिया वाढावी, म्हणून हे लोक आपल्या देहाचीं प्रयोगलयें करतात! धन्य हे गोरगरीब!

वसंता : त्या रोग्याचें व त्या बरदाशींचें भांडण चाललें आहे.

रोगी : अरे, आणखी थोडा दे रे कागद! एकढ्यानें ढुंगण कसें पुसूं ? जुलाब दिला आहे मला! पातळ होतें रे शौचाला !

बरदाशी : मोठा बादशहा कीं नाहीं तूं! बाहेर दगडाधोंड्याला पुसत असला ढुंगण! येथें कागद मिळाला तर म्हणे आणखी द्या. फुकटचें मिळालें कीं लुटायचें हा आपल्या लोकांचा नियमच आहे! तेवढ्याच कागदाला पूस.

रोगी : अरे, बाहेर आम्हांला कोरडें शौचास होतें. दगड नसला तरी चालेल! सुटसुटीत! येथें जुलाब दिला आहे आज! दे रे राजा! त्यांना चार दिलेस कागद मला दोन तरी दे !

बरदाशी : तूं देतोस चार आणे मला ? म्हणे त्यांना कागद दिले! ते आणि तूं का सारखे ? त्यांच्या घरची मंडळी माझी चिंता करतात. माझे हात ओले करतात. मग नको द्यायला कागद ? तुझयाजवळ भिकार्‍या काय आहे ? उद्यां बरा होऊन जाशील. कांहीं ठेवशील का हातावर ? म्हणे कागद द्या.

रोगी : घरीं यायला पोटभर नाहीं, तुला दादा कोठून देऊं ?

बरदाशी : मग अशा चतकोर कागदालाच पुसावी लागते! बडबड करुं नको.

दुसरा रोगी : आज फुलें नाहीं आणलींस ?

बरदाशी : विसरलों दादा! मग आणीन हां. गुलाबाची सुंदर फुलें घेऊन येईन. तुम्हांला संत्रीं मिळालीं ना ?

दुसरा रोगी : हो.

बरदाशी
: जातों दादा. जरा घाई आहे. तिकडे बडे डॉक्टर येत आहेत.