सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 87

सहावें दर्शन

वसंता : वेदपुरुषा! तुमच्याबरोबर हिंडावे व जगांतील सारें दु:ख पहावें असें मनांत येत आहे.

वेदपुरुष : अरे, शितावरुन भाताची परीक्षा. समुद्राचा एक थेंब खारट तसा सारा समुद्रच खारट. वसंता, हें विराट दु:ख पाहून विरक्त होऊं नको म्हणजें झालें. नाहीं तर तुझी छाती दडपली जाईल. निराशा पदरीं येईल. तुझ्या इतर मित्रांप्रमाणें हातांत झेंडा घेऊन दु:ख दूर करावयास उभा रहा.

वसंता : बिहारात भूकंप होऊन लाखों घरें पडली. हजारो माणसें पुरलीं गेली. स्वयंसेवक पहात राहिले. तो महान् नाश पाहून हातांत खोरी कुदळीं घेऊन पहात राहिले. टिकम घेऊन ते खणूं लागले. ते मुडदे बाहेर काढूं लागले. वीर कार्याला हात घालतो. तो गांगरून जात नाही. त्याची स्फूर्ति लाखांना प्रेरण देते.

वेदपुरुष : होय.

वसंता : आज कोठें जावयाचें ?

वेदपुरुष : वसंता, अरे विषमता पाहावयास कोठें जावयास नको. जेथे डोळे. फेंकशील तेथें अधर्म आहे, अन्याय आहे. जेथे दृष्टी देशील तेथें सोन्यासारखीं जीवनें होरपळलीं जात आहेत.

वसंता : तो पहा तेथें झाडू उभा आहे. तो काय मागत आहे ?

वेदपुरुष : तो काही तरी शिमग्याचें पोस्त मागत आहे.

झाडू : तुम्ही रावसाहेब गांवाला गेले होतेत. तुमच्या दारीं आशेंनें मी तीनदां तीनंदा आलों. होळी तर गेली. परंतु पोस्त माझें राहिलें आहे. दरसाल तुम्ही देतां.

सभ्य गृहस्थ : मग तुला काय हवें, बोल.

झाडू : तें मी कसें सांगू ? दुनिया देते तें तुम्ही द्या.

सभ्य गृहस्थ : तूं मागशील तें मी तुला देईन.

झाडू : असें कसें होईल ? गरिबाची थट्टा नका करूं दादा.

स. गृ : थट्टा नाहीं हों. माझ्या अंगावर गांधीची खादी आहे. गरिबांसाठीं तडफडणार्‍या  गांधीचीं खादी आहे.
झाडू : त्यांचे लोक आमचेबरोबर झाडतात, घाण उचलतात. आम्हाला ते हलकट नाहीं समजत. गांधी म्हणजे मायबाप आहे.

स. गृ : मग ती तुझी थट्टा करीन का ? खरेंच सांगतो. मी आता गांधींच्या मोठ्या सभेहून आलो. तिकडे लांब बेळगांवकडे होती. तेथें आम्ही रस्ता दुरुस्त केला. गांधीचे शब्द ऐकले. हृदय अजून शुध्द आहे. गरीबांबद्दलचें उत्पन्न झालेलें प्रेम येथल्या सोन्यामारुतीच्या बुभु:कारांत अजून आटून नाहीं गेंलें. सांग. माझें हृदय आज भरलेंले आहे. तूं मागशील तें मी देईन.