सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 86

मास्तर : असे म्हणूं नयें.

मुलें : खरें तें बोलांवे. तुम्हीच ना सांगितलेंत ?

एक मुलगा : तुमचे घर कोठे ? आंम्ही तेथें येऊं.

दुसरा : मीं पाहिली आहे खोली. खोलींत गांधीचें चित्र आहे.

मुलें
: आमच्या वर्गात कां नाहीं मास्तर गांधीचें चित्र ?

मास्तर : मी काय सांगूं ? मी आतां जातों. तुम्ही चांगली मुलें व्हा.

मुलें : तुम्ही नाहीं मग आम्ही कशीं चांगली होऊं ?

मास्तर
: व्हाल. देव तुम्हांला चांगलं करील. जा. आतां रडूं नका. वेडेच आहांत. जा हो. सोडा सायकल.

मुलें : गेले आपले मास्तर. दोन महिन्यांचे मास्तर.

एकजण : कसें सांगत, कसें शिकवीत !

दुसरा : ते खादी वापरीत.

तिसरा : त्यांच्या खिशांत झेडां असे.

मुलें : गेले. चांगले मास्तर गेले मारकुटे फेटेवाले मास्तर आले !

वसंता
: या मुलांची हृदयें म्युनिसिपालिटीस कळतील तर किती छान होईल ?

वेदपुरुष
: म्युनिसिपालिटीच्या इमारतीवर भगवा झेंडा आहे व तिरंगी झेंडा आहे. परंतु म्युनिसिपालिटीच्या शाळेंत असला ध्येयवादी सहहृदय शिक्षक पचत नाही! सारे वरुन डोलारे! बालहृदयें मारली जात आहेत. नवीन पिढी कापली जात आहे. उघांचा भारत भरडला जात आहे. परंतु कोणाचे आहे लक्ष ? सोन्यामारुतीपुढें घंटा वाजवूं बघतील! परंतु ह्या मुलांच्या हांका कोण ऐकणार ?

वसंता : खरेंच. कोण ऐकणार ?