सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 82

वेदपुरुष : शाळेचें ऑफिस दिसतें.

वसंता : ते खुर्चीवर बसलेले शाळेचें मुख्य चालक दिसतात. शाळेसमोर हा कोण तरुण आहे ?

वेदपुरुष : हा तरूण शाळेंतील एक शिक्षक आहे.

वसंता : कां बरें तो असा उभा आहे ?

वेदपुरूष : त्यांच्या संवादावरून कळेल. तो संवादच ऐक.

शिक्षक
: माझा यांत काय बरें दोष ?

चालक : पुन्हा काय दोष म्हणून विचारतां ?

शिक्षक : मुलांनीं विचारलेल्या प्रश्नांचें उत्तर देणें म्हणजे का गुन्हा आहे ? मुलांची जिज्ञासा तृप्त करणें हें तर शिक्षकाचें पहिलें कर्तव्य आहे.

चालक : परंतु जिज्ञासेजिज्ञासेंतहि फरक करायला हवा.

शिक्षक : मुलांची जिज्ञासा ही सदैव निर्मळच असते असें गृहीत धरलें पाहिजे. सर्व जिज्ञासा पवित्र आहे. निदान प्रस्तुत प्रसंगाची तरी त्यांची जिज्ञासा मला सदोष वाटली नाहीं.

चालक : 'आपल्या देशांत एक एप्रिलला हरताळ कां पडणार आहे ?' असें त्यांना मुलांनीं विचारलें.

शिक्षक : होय. या हरताळाचें महत्त्व काय, तो कां पाडावा, पाडणें योग्य आहे कीं नाहीं वगैरे प्रश्न ते मला विचारीत होते. मी इतिहासशिक्षक आहें. हिंदुस्थानची राज्यपध्दति मला शिकवावी लागते. या प्रश्नांची उत्तरें माझ्यापासून मुलें नाहीं का अपेक्षिणार ? मीं त्यांना हरताळ पाडा असें सांगितलें नाहीं. हिंदुस्थानभर हरताळ कां पडणांर आहे तें मीं समजावून सांगितलें.

चालक : तुम्ही काँग्रस, जवाहीरलाल वगैरे शब्द उच्चारिलेत कीं नाहीं ? जवाहीरलालांची स्तुति केलीत कीं नाहीं ?

शिक्षक : त्यांची स्तुति कोण करणार नाहीं ? अणुरेणु त्यांची स्तुति करील.

चालक : तुम्हीं कोणचें वर्तमानपत्र वर्गांत नेलें होतें ?

शिक्षक : लोकशक्ति.