सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 75

वसंता : काम न करणार्‍याला शेणाचा पो समजावें. तो शेणगोळा. ज्याचे हात श्रम करीत नाहींत, त्याला काय म्हणून मान ?

कल्याण : त्यांनाच तर मान मिळतो. शेतकर्‍याला, कामकर्‍याला सारे हंसतात. ज्याचे कपडे मळलेले नाहींत, तो मोठा समजतात.

वसंता : ती खोटी आहे समजूत. काम करतांना ज्याचे कपडे मळले, फाटले, ज्याचे वरचेच कपडे काय परंतु हातपायहि फाटले, ठेचले, त्याच्यासारखा पवित्र कोणी नाहीं.

चंदन : येथून तुम्ही आतां नीटच जा.

वेदपुरुष : नमस्कार मुलांनो!

वसंता : रामराम गडयांनो !

चंदन
: वंदे मातरम्.

कल्याण : वंदे मातरम्.

त्या गांवचे ते दोन लहान प्रतिनिधी निघून गेले.

वसंता : नवभारत तयार होत आहे.

वेदपुरुष : जमीन तापली आहे. विचारांची पेरणी करा. भावनांची वृष्टि करा.

वसंता : सोन्यामारुति! खरोखरच हीं सोन्यासारखीं मुलें होतीं. त्यांच्यांत मिसळलें पाहिजे. त्यांच्यांत शिरले पाहिजे.

वेदपुरुष : श्रीकृष्ण गवळ्यांत मिळाला. गोकुळांत त्यानें साम्यवाद निर्माण केला. श्रीमंत गरीब त्यानें एकत्र आणले. त्यानें सर्वांना काला दिला. त्या एकत्र शिदोरीचें पावित्र्य कोण वर्णील ? यमुनेच्या पाण्यांत हात धुतांना जे शितकण पडत, ते खायला मिळावे म्हणून देव मासे होऊन त्या नदींत उतरले होते. जगांतील सारे एकत्र काम करीत आहेत, एकत्र गाई चारीत आहेत, एकत्र शेती करीत आहेत, एकत्र विणीत आहेत, एकत्र शिकत आहेत, एकत्र खेळत आहेत, एकत्र खात आहेत -- केवढा तो आनंद ! गोकुळींच्या सुखा! अंतपार नाहीं देखा

वेदपुरुष : तें ध्येय साध्य होण्यासाठीं या कौट्यवधि सोन्यामारुतींच्या सेवेला या. या महान् मंदिरांत या. ही महान् पूजा सुरू होऊं दे.

वसंता : ही सकाळची वेळ किती सुंदर आहे ?

वेदपुरुष : बाल्य पवित्र असतें. सरळं, मधुर असतें.

वसंता : तीच सृष्टि. परंतु सकाळच्या वेळीं नित्य नवीन वाटते.

वेदपुरुष : झोपेंतून उठल्यावर सारें नवीन वाटतें. भारताला आज सारें नवीन वाटेल. कारण भारत बौध्दिक झोपेतून जागा होत आहे. तेच विचार, तींच ध्येंयें. परंतु आज तीं नवीन वाटतात! लोकांना चुकल्याचुकल्यासारखें वाटतें.

वसंता : त्या साळुंक्या पहा! केवढा थवा !