सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 72

मारुतीच्या देवळांत यांना घेऊन जां. आम्हांला मागून त्रास देतात हो. अहो मनांत आमच्य तुमचेंच आहे. मतें गांधीलाच दिलीं. परंतु बाहेर जरा भ्यावें लागतें.

वसंता : आम्ही मंदिरांत जातों. तुम्हांला अडचणींत आणण्याची मुळींच इच्छा नाहीं.

पाटील : राम राम.

वसंता व वेदपुरुष मारुतीच्या देवळांत जाऊन बसले. फौजदार आल्यामुळें आईबापांनीं आपल्या मुलांना घरांतच डांबून ठेवलें.

वसंता : फौजदार येतांच किती भीति पसरली ?

वेदपुरुष : तुम्ही वरचेवर या म्हणजे भीतिं नाहींशी होईल. ही तुमचीच चूक आहे. दिवा आणला म्हणजे अंधार जातो. निर्भय लोक समाजांत वावरूं लागले म्हणजे समाजांतील भीति कमी होते. निर्भय जीव म्हणजे भीतीच अंधार दूर करणारे दीप. न्या हे दिवे सर्वत्र. सरूं दे अंधार. भरूं दे प्रकाश.

वसंता : मुलांना किती उत्साह असतो.

वेदपुरुष : हे सारे सोन्यामारुती आहेत. यांची पूजा करा. हे रामराज्य निर्माण करतील, सर्वोदय आणतील.
हळूच दोन मुलें देवळांत आलीं.

वसंता : कोण आहे ?

मुलें
: आम्ही आहोंत.

वसंता : या. भिऊं नका. बसा जवळ. तुमचीं नांवें काय ?

एक : माझें नांव कल्याण.

दुसरा : माझें नांव चंदन.

वेदपुरुष : किती गोड नांवें! जगांत चंदनासारखे झिजणारेच कल्याण आणीत असतात.

वसंता : तुम्ही कां आलेत ?

कल्याण : आपले सहज.

चंदन : आम्हीसुध्दां जाऊं.

कल्याण
: पण आई रडेल.

चंदन : मागें आमच्या गांवांतून सदाशिव गेला होता. त्याच्या वडिलांनी त्याला कोंडून ठेवलें होतें. परंतु तो पळाला.

वसंता : हल्लीं तो कुठें आहे ?

चंदन : तो मिलमध्यें आहे. त्याला खूप गाणीं येतात.

कल्याण : आज फौजदार आला नसता तर तुम्ही पोवाडे म्हणणार होतात ना ?

वसंता : हो.

चंदन :  तुमचें जेवण झालें का ?

वसंता : दुपारीं गाडींत आम्हीं भाकर खाल्ली होती.