सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 60

वसंता : तुम्ही बियापुरतें ठेवीत कां नाहीं ?

म्हातारा : सरकार, सावकार वारून खायला पुरत नाहीं, तर बियाला कोठून उरणार ? आम्हांला समजत का नाहीं ?

वेदपुरुष : पीक कमी होण्याचें कारण काय ?

म्हातारा : एकतर पाऊसहि कमी झाला. आणि जमिनीचा कसहि उतरला.

वसंता : जंगलाची तूट झाल्यामुळें पाऊस कमी होत आहे. अमेरिकेंत लाखों झाडें दर वर्षी लाविलीं जातात. परंतु आमचें सरकार काय करीत आहे ?

वेदपुरुष : झोंपा काढीत आहे.

म्हातारा : कर घ्यायच्या वेळेस मात्र जागें असतें.

वसंता : जमिनीचा कस कां कमी झाला ?

म्हातारा : खत भरपूर नसतें.

वसंता : कां ?

म्हातारा : गुरेंढोरें कमी झालीं. पूर्वी आमच्या गांवांत कितीतरी गुरें होतीं माझ्याकडे दोन खंडी गुरें होतीं. पूर्वी जंगलांतील गवतावर कर नव्हता. गायरानें मोफत असत. कुरणें असत. गुरें मस्त राहात. परंतु आतां चारा नाहीं. सर्वत्र कर. ढोरें कमीं झालीं म्हणून खत कमी झालें. खत कमी म्हणून पीक कमी.

वेदपुरुष : सरकार वळू देत आहे.

म्हातारा : आधीं म्हणावें गायरानें मोकळीं करा. आमच्या गांवच्या मालकीचें कुरण गांवाला लागून होतें. सारा गांव सहाशें रुपये त्या कुरणाचा कर भरी. सहाशें रुपयांत गांवांतील शेंकडों गुरे तेथें पोटभर चरत. परंतु दोन वर्षापूर्वी हे सहाशें रुपये भराचला पंचांना जरा उशीर झाला. सारें कुरण सरकारनें जप्त केलें! गुरांना चारा नाहीं. पहाडांत गुरें पाठवावीं लागतात, त्यामुळें खत नाहीं. पहाडांत उष्णता फार असतें. त्यामुळें रोग होतात व गुरे मरतात. शेतक-यांची दैना विचारुं नका.

वेदपुरुष : तुम्ही संघटना करा, संघ स्थापा, झगडा, भांडा.

म्हातारा : आतां आम्ही म्हातारे झालों. पोरांचें आतां काम आहे.

वसंता : तुमच्या गांवांत झेंडा आहे का ?

म्हातारा : पोरें झेंडा काढतात. गाणीं म्हणतात. परंतु पाटील त्यांना दडपतो. एका मुलाच्या परवां त्यांने थोबाडींत दिली. त्याच्या बापाला म्हणाला, ''सांभाळ तुझा पोर, नाहीं तर तुरुंगांत डांबीन.''