सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 51

माणक्या : नको. मला तें नको. परंतु फाडूं नका. विष्णूभगवान् फाडूं नका.

सुभेदार : दवाखान्यांत तुला बरदाशी केलें तें एवढ्यासाठीं होय? चांगली फत्तारगाडी दिली पाहिजे.

माणक्या : नाहीं. पुन्हा पूजा करणार नाहीं.

वसंता : किती सुंदर आहे चित्र! हृदयांत किती भक्तिप्रेमाच्या भावना उसळतात !

वेदपुरुष : परंतु तुरुंग हे हृदयांत भीति व दहशत कायमची बसावी यासाठीं असतात. हृदयांत प्रेम, आनंद, आशा निर्माण व्हावींत, यासाठी नसतात.

वसंता : बंदुका घेऊन हे पहारेकरी कां फिरत आहेत ?

वेदपुरुष : येथें फांशी कोठा आहे. फांशीचे उमेदवार येथें ठेवण्यांत येत असतात.

वसंता
: त्यांच्या चेहर्‍यांकडे पहावत नाहीं. क्षणाक्षणाला ते फांशी अनुभवीत आहेत. हजार वेळां ते फांशी दिले जात आहेत.

वेदपुरुष : ही पहा त्याची मंडळी त्याला भेटावयास येत आहे.

वसंता : करुण, करुण दृश्य !

वेदपुरुष : ती म्हातारी आई दिसते! तिच्यानें बोलवत नाहीं. ती वर हात करीत आहे, खालीं आपटीत आहे. 'हा हा !' एकच शब्द तिच्या तोंडांतून फुटत आहे. एकच अक्षर 'हा'! त्या एका अक्षरांत किती दु:खसागर सांठवलेले आहेत !

वसंता : तो गजाजवळ उभा आहे. तोहि बोलत नाहीं. काय बोलेल ?

शिपाई : आटपा लौकर.

आई : हा हा !

भाऊ : आई, चल बाहेर.

आई : हा हा !

वसंता : त्या भेटायला आलेल्या भावाला आईचें दु:ख पहावत नाहीं. या जगांत दु:खप्रदर्शनाला किंमत नाहीं. तो पहा आईला ओढीत आहे.

शिपाई : चला लौकर.