वसंता : ''नभासारिखें रूप या राघवाचें.''
वेदपुरुष : असें तोंडानें म्हणतील, परंतु या व्यापक रामाला कोंडून ठेवतील. आकाशाप्रमाणें सर्वांवर पांघरूण घालणारा मेघश्याम राम ! त्यांचे स्वरूप पाखंडी पंडितांना कोठून कळणार ?
वसंता : त्या नाशिकच्या सत्याग्रहाला बाहेरूनहि हरिजन आले होते का ?
वेदपुरुष : हो. खेड्यापाड्यांतून लोक आले होते. उन्हातान्हांतून पाय चटचट भाजत असतां येत होते. ''टळटळित दुपारीं जन्मला रामराणां'' रामाचा जन्म उन्हांत होत असतो. उन्हांत तडफडणार्या जिवाच्या हृदयांत होत असतो. रामाच्या रथाला हात लावण्यासाठीं हरिजन जात, परंतु त्यांच्या कमरेंत लाथ मिळे, पाठीत बडगा बसे.
वसंता : वाटेंतहि लोकांनीं त्यांचे हाल केले असतील ?
वेदपुरुष : एका गावांच्या धर्मभक्तांनीं सत्याग्रही हरिजनांवर शेणमार केला. एके ठिकाणीं त्यांना पाणी मिळूं दिलें नाही.
वसंता : एक सत्याग्रही बाई तहानेंनें तडफडून मेली असें वर्तमानपत्रांत आलें होंते.
वेदपुरुष : पाण्याशिवाय हरिजन गांवोगांव मरत आहेत! पाणीदार तेजस्वी सनातनी हरिजनांना पाणीहि मिळूं देत नाहींत!
वसंता : या गांवातूनहि हरिजन सत्याग्रहासाठीं गेले होते का ?
वेदपुरुष : हो. रामगांवांतील हरिजन वारकरी आहेत. येथून बरेच जण सत्याग्रहांसाठीं गेले होते.
वसंता : ती बाई कोण येत आहे ? केंस पहा किती मळकट आहेत, तोंड पहा किती उंतरलेलें आहे !
वेदपुरुष : तीन दिवसांत ती जेवलेली नाहीं. चिंचेचा पाला शिजवून ती खाते. चिंचोके भाजून खाते.
वसंता : कां बरें ! ती कामाला कां जात नाही ?
वेदपुरुष : येथील सर्व हरिजनांवर स्पृश्यांनी बहिष्कार घातला आहे. हरिजनांना ते कठोर धर्माचा धडा शिकवीत आहेत. त्यांना कोणीहि कामाला बोलावीत नाहीं. मजुरी त्यांना मिळत नाहीं. कितीतरी माणसें गांव सोडून गेलीं.
वसंता : त्यांची दाद कोण घेणार ?
वेदपुरुष : खर्या सोन्यामारुतीचे उपासक घेणार! खर्या रामाचे भक्त घेणार.
वसंता : ती पहा महारीण येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून पाणी गळत आहे.