सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 34

वेदपुरुष : रामाचे उपासकहि येथें बरेच आहेत.

वसंता : थट्टेनें म्हणतां कीं सत्यार्थाने ?

वेदपुरुष
: थोडी थट्टा, थोडी सत्यता.

वसंता : म्हणजे काय ?

वेदपुरुष : येथील हरिजनांत रामाचे भक्त आहेत. स्पृश्य मंडळींत रूढींचे भक्त आहेत.

वसंता : भावनांचें पीक ज्यांना आपण तुच्छ, तिरस्कृत समजतों त्यांच्या जीवनांतच अधिक येतें नाहीं ? ते लोक प्रेमळ असतात, त्यागी असतात, कष्टाळू असतात, त्यांना दिव्य ध्येय दाखवा. त्या ध्येयाला मिठी मारावयास ते एकदम तयार होतात. त्यांची हृदयें सरळ असतात, विचाराचा निर्मळ प्रकाश एकदम तेथें जातो. वाटेंत संशयाचे स्वार्थाचे दाट पडदे येत नाहींत. आला, गांव आला.

वेदपुरुष : ती मोठी हवेली दिसते ना, ती एका बड्या जमीनदाराची आहे.

वसंता : पूर्वजांनीं पराक्रम केला असेल.

वेदपुरुष : त्यांच्या घरांत रामाची सोन्याची मूर्ति आहे. रामोपासक घराणें आहे हें.

वसंता : गांवांत त्यांना मान मिळत असेल ?

वेदपुरुष : पैशाला मान कोण देत नाहीं ? पैसा मिळवणारा माना मुरगळो किंवा गुलामगिरी लादो. तो पूज्य व सेव्य असतो. आणि त्यांत आणखी धर्मांचे ढोंग मिसळून द्यावें. मग तर काय निर्दोष व्यवहार झाला.

वसंता : त्यांच्या वाड्याच्या ओट्यावर बरीच मंडळी जमली आहे.

वेदपुरुष : ते चर्चा करीत आहेत.

वसंता : दोन सत्याग्रहांची चर्चा चालली आहे ?

वेदपुरुष : हो.

वसंता : एक पुण्यांतील सोन्यामारुतीचा, दुसरा कोठला ?

वेदपुरुष : दुसरा नाशिकचा.