सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 33

दुसरें दर्शन

वसंता : वेदपुरूषा! आपण कोठें आतां जाणार ?

वेदपुरुष : रामाच्या निवासानें पवित्र झालेल्या गोदावरीच्या तीरीं जाऊ.

वसंता : तेथे काय पहावयाचें ? काय ऐकावयाचें ?

वेदपुरुष : सर्वत्र एकच दर्शन, एकच श्रवण तुला मी सोन्यामारुति दाखवणार आहे. काळेकुळकुळीत सोन्यामारुति.

वसंता : मारुतीचा रंग काळाच होता. आपण लहान खेड्यात जाणार आहोंत का शहरांत जाणार आहोंत ?

वेदपुरुष : लहान खेड्यांत.

वसंता : खेड्यांतील लोकांत माणुसकी अधिक असते नाही ?

वेदपुरुष : अविचार व रूढी यांचें प्राबल्यहि पुष्कळ असतें. शहरांत कोण कोणाला विचारतो ? परंतु खेड्यात ताबडतोब गोष्टी पसरतात. झटपट न्याय असतो. धर्माच्या रूढ कल्पना मेले तरी ते सोडणार नाहीत. जो कोणी बंड पुकारील त्याला छळतील, त्याच्यावर बहिष्कार घालतील.

वसंता : झाडीत दिसतें तेंच खेडें का ?

वेदपुरुष : होय.

वसंता : गंगेचा प्रवाह कांही फार मोठा नाहीं येथें.

वेदपुरुष :परंतु थोड्याचाहि आधार असतो.

वसंता :या खेड्याचें काय नांव ?

वेदपुरुष : रामगांव.

वसंता : किती गोड नांव !