सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 19

दगडू : परंतु याच्याविरुध्द कोण उठणार ? या अन्यायाविरुध्द कोण झगडा करणार ?

शिवराम
: आपणच उठलें पाहिजे. आपणांसाठीं दुसरें कोण येणार आहे? सर्व देशांत चळवळी सुरू झाल्या आहेत. लाथा खाणारे मजूर माना वर करीत आहेत. आपली खरी सत्ता मिळवीत आहेत. लंकादहन करीत आहेत.

हरि : परंतु एकदम कांहीं होणार नाहीं. एकदम यश पदरांत पडणार नाहीं.

बन्सी : आरंभ हा केलाच पाहिजे. परंतु कोणी तरी मार्गदर्शक राम भेटला पाहिजे. त्यागी वनवासी राम भेटला पाहिजे.

दगडू : खरा राम मिळाला पाहिजे. जो खरा राम असेल तो आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. खर्‍या रामाला अयोध्येंतील सुखविलास सुचत नाहींत. वानरांची दैना चालली असतां राम का अयोध्येंत नांदेल ? वानरांना सोन्याच्या लंकेंतील रावण त्राहि त्राहि करीत असतां राम का गाद्यागिर्द्यांवर लोळत बसेल ? वानरांना मिठी मारण्यासाठीं राम धांवत येईल. या वानरांत तो तेज निर्माण करील. या वानरांन नवजीवन देईल. वानरांचा कैवारी राम केव्हा बरें आपणांस भेटेल ?

खंडू : वानरांची बाजू घेण्यासाठीं राम निघाला म्हणजे त्याच्याबरोबर वरचे वर्ग कोणी येणार नाहींत. अयोध्येतील शेट-सावकार, जमीनदार, जहागीरदार कोणी येणार नाहींत. गरिबांची बाजू घेणार्‍या रामाच्या झेंड्याखालीं गरीब जमा होतील, वानर येतील, रीस येतील, पायांखाली तुडवलेली सारी जनता रामाच्या भोंवतीं गोळा होईल.

शिवराम : अरे! आपण म्हणजेच वानर, आपण म्हणजेच रीस, आपण म्हणजेच खारी. आपणांला आज मनुष्यत्वाचे कोठें आहेत हक्क! आपण पशूप्रमाणें वागविले जात आहोंत. आपण उठूं या. आपण माणसें होऊं या. वानरांचे नर होऊं या. नारायण होऊं या.

हरि : वेळ येत आहे. आपणांस मनुष्यत्व देणारा राम येत आहे. रामाचे दूत त्याचा झेंडा घेऊन पुढें आले आहेत. लाल झेंडा! वानरांचीं बाजू घेणार्‍या  रामाचा रक्तध्वज !

बन्सी : आठ दिवसांपूर्वीच त्या झेंड्याचा दिवस साजरा केला गेला! मे महिन्याची पहिली तारीख. सार्‍या जगांत लाखों ठिकाणीं तो दिवस साजरा केला गेला.

खंडू : लाल बावट्याच्या सभेला जाऊं नका असें फर्मान निघालें होतें. मी त्या सभेला गेलों नाहीं.

शिवराम : मीहि धजलों नाहीं.

हरि : मी अर्ध्या वाटेंतून परत आलों.