सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 5

पहिला : अजून तसें वातावरण शांत आहे. परंतु एखादे वेळेस दंगा होण्याचाहि संभव आहे. म्हणून पुण्याला जाणें जरा धोक्याचें वाटते. नाहींतर अशा पर्वणीच्या वेळेस अवश्य पुण्यास गेलें पाहिजे होतें. परंतु सुखाचा जीव धोक्यांत कां घाला ?

दुसरा
: अहो, महाभारतांत सांगितलें आहे :

''जीवन धर्ममवाप्नुयात्''

जिवंत राहून धर्म मिळवावा. सर्वांनींच मरावयाचें नसतें. ज्यानें त्यानें आपल्या वृत्तीशीं सत्य राहिलें पाहिजे. आत्म्याची वंचना नको.

पहिला : म्हणूनच मी आत्मसंशोधन करीत असतों. एकदां प्रथम वाटलें कीं आपणहि जाऊन सत्याग्रह करावा. परंतु पहिली उसळी खरी नसते. बायको तर रडायलाच लागली. मीं म्हटलें, ''अग वेडये, थट्टा नुसती हो. खरें का कोणी तुरुंगांत जातें ?''

दुसरा : तसें पाहिलें तर खरोखर धर्मांसाठीं कोण जात आहे ? जो तो आपल्या प्रतिष्ठेसाठीं जातो. तो सारा अहंकार आहे.

पहिला
: माझेंहि म्हणणें तेंच. पुण्याला कांहीं लोक करूं लागले सत्याग्रह. अहो, उद्या निवडणुकींत तुणतुणे नको का वाजवतां यायला! हें सोन्यामारुतीचें शेंपूट बरें सांपडलें आपल्या लोकांना. हें शेंपूट आंखूड होतें, लांब होतें. अहो, कोणत्याहि संधीचा नीट उपयोग करून घेणें म्हणजेच व्यवहार! ते काँग्रेसवाले मग बसतील बोंबा मारीत. सोन्यामारुतीचा किती व्यावहारिक फायदा आहे हें त्या मूर्खांच्या डोक्यांत शिरतच नाहीं.

दुसरा
: गांधींचे आंधळे बुध्दिहीन भक्त. बुध्दि चालवावी लोकशाही पक्षाच्या लोकांनीच. महाराष्ट्राची नाडी तेच जाणतात! हजारोंना झुलवतील. सत्याग्रह सुरू होईल ह्या कारस्थानी लोकांकडून व मार खातील मग धर्म शब्दानें हुरळणारे इतर साधे लोक !

पहिला
: सोन्यामारुतीचें निमित्त करून निघाले महिन्याच्या यात्रेला. तसें मनांत धर्मबिर्म त्यांच्या कांहीं नाहीं. मुत्सद्दी मनांत असतें तर गल्लो-गल्लीं त्यांनीं सभा केल्या असत्या. निवडणुकीच्या वेळेस जेवढा प्रचार त्यांनी केला, तेवढा तरी त्यांनीं केला असता. मतदार आणण्याला जितक्या मोटारी धांवत होत्या, त्याच्या शतपट सत्याग्रहींच्या तुकड्या आणण्यासाठी धांवल्या असत्या. तसें पोटांत कांही नाहीं. देव नाहीं, धर्म नाहीं. आम्ही धर्मासाठीं तुरुंगांत गेलों असें उद्यां म्हणतां यावें ही आहे मख्खी. अहो, एक महिना तुरुंगांत जाऊन सारी काँग्रेसची पुण्याई बुडवतां येणार आहे. कांहीं लोक तुरुंगांत जाऊन सारी काँग्रेस महाराष्ट्रांत चिरडली जाणार आहे. अत्यल्प त्यागानें केवढें फळ मिळणार आहे! याला म्हणतात कावा, याला म्हणतात मुत्सद्देगिरी, याला म्हणतात व्यावहारिक धर्म.

दुसरा
: बाकी महाराष्ट्रानेंच राजकारण करावें. सार्‍या हिंदुस्थानचें राजकारण महाराष्ट्रानें चालवलेलें आहे. ते पूर्वसंस्कार का रक्तांतले जातील? आईच्या दुधाबरोबर महाराष्ट्रीय राजकारण पीत असतो! शाबास पुणेंकरांची! काँग्रेसची अब्रू धुळींत मिळवली जाणार! आणि महिना आठवड्याच्या शिक्षेनें! जगांत असा विजय कोणीं मिळविला नसेल! ही रक्तहीन क्रांति आहे.