सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 3

पहिला : अहो, पुण्याला मी जाणार होतों. येथें अतीच उन्हाळा होतो. सहन नाहीं होत. वाळ्याच्या ताट्या सोडल्या आहेत तरी अंगाची तलखी होते. भिंतींना हात लाववत नाहीं, इतक्या तापतात !

दुसरा
: आपण मजूर, हमाल थोडेच आहोंत! ज्याची त्याची संस्कृति भिन्न असते. आपली पांढरपेशी संस्कृति उन्हातान्हांत करपून जाईल. मजुराला उन्हातान्हांत कांही होत नाही. परंतु माझी बबी काल जरा दोन वाजतां बाहेर गेली होती, तिला तें सहन झालें नाहीं. कोमेजून गेली पोर!

पहिला
: मुलांबाळांना तर येथील उन्हाळा मारकच आहे. या उन्हाळ्यांत जगणारीं तीं का माणसें ? अहो, दगडाच्यासुध्दां उन्हांत फुटून लाह्या व्हायच्या! मग सुकुमार बबीसारख्या फुलांची काय स्थिती होईल, तिची कल्पनाच केलेली बरी. मी पुण्याला जायचें नक्की केलें होते, परंतु अकस्मात् विघ्न आलें.

दुसरा : बंगला मिळत नाहीं वाटतें ? अहो, पुण्याला पुष्कळ सनातनी बंगले आतां झाले आहेत. आजूबाजूला गलिच्छ वसती नाहीं, सर्वत्र स्वच्छता असे बंगले मिळायला आतां कठीण नाहीं. पर्वतीच्या बाजूचें वातावरण आधींच पवित्र आणि त्यांत सनातनी लोकांची वाढती वसती!

पहिला :
बंगला वगैरे मिळाला होता. सारी सोय होती. परंतु पुण्याची हकीकत नाहीं वाटतें आली तुमच्या कानांवर ?

दुसरा
: पुण्याला आतां सारें सामसूम आहे. निवडणुकींत दंगल होती. सनातनी लोकशाहीपक्षानें मात्र शर्थ केली. शेवटपर्यत त्या धर्मभ्रष्ट कॉग्रेसला त्यानें टक्कर दिली. सर्व खर्‍या अस्सल हिंदूंची मतें कॉग्रेसच्या विरुध्द गेलीं  म्हणतात. धर्म आधीं पाहिजे. धर्म नाहीं तर काय राहिलें ? सारें धर्मासाठीं. हिंदूंचे तरी सारें धर्मांसाठीं! आतां पुण्याला म्हणे छान संघटना होत आहे. पुढच्या निवडणुकींत निश्चित विजय! धर्माचा झेंडा आज ना उद्या उंच फडकल्याशिवाय कसा राहील ?

पहिला
: पुण्याला धर्मयुध्द सुरू झालें आहे.

दुसरा :
केव्हांपासून ?

पहिला
: कालपासून.

दुसरा
: अहो, माझा मुलगा अजून तेथेंच आहे. ताबडतोब निघून यावें कीं नाही? या पोराला कांहीं समजत नाहीं. तार देतों त्याला.

पहिला : अहो, हें सोन्यामारुतिप्रकरण. सरकारनें वाद्यबंदीचा म्हणे हुकूम काढला आहे !