बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 23

अर्हत्पद:- १ सक्कायदिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), २ विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि संघ यांजविषयीं शंका किंवा अविश्वास), ३ सीलब्बतपरामास (स्नानादिव्रतांनींच मुक्ति मिळेल असा विश्वास), ४ कामराग (कामवासना), ५ पटिघ (क्रोध), ६ रूपराग (ब्रह्मलोकादि प्राप्तीची इच्छा), ७ अरुपराग (अरूपदेवलोकप्राप्तीची इच्छा). ८ मान (अहंकार), ९ उद्धच्चं (भ्रांतचित्तता) आणि १० अविज्जा (अविद्या) या दहा पदार्थांना संयोजनें (बंधनें) म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासानें या दहा संयोजनांचा नाश झाला म्हणजे अर्हत्पद प्राप्त होतें. अर्हत्पद प्राप्त झाले म्हणजे निर्वाणाचा पूर्णपणे साक्षात्कार होतो.

सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा असे निर्वाणमार्गांत समाविष्ट झालेल्या व्यक्तीचे चार भेद आहेत. पहिल्या तीन संयोजनांचा क्षय झाला म्हणजे मनुष्य सोतापन्न (स्रोतआपन्न) होतो. सोतापन्न असतांना जर त्याला मृत्यू आला, तर तो देवलोकी आणि मनष्यलोकीं फार झालें तर सात खेपा जन्म घेतो. सातव्या जन्मीं त्याला मोक्ष मिळालाच पाहिजे. पहिल्य तीन संयोजनांचा नाश करून काम, राग, द्वेष आणि मोह हे दुर्बळ झाले म्हणजे मनुष्य सकदागामी (सकृदागामी) होतो. अशा स्थितींत त्याचा अंत झाला तर तो एक वेळच इहलोकीं जन्म घेतो व मोक्ष मिळवितो. पहिल्या पांच संयोजनांचा नाश झाला म्हणजे मनुष्य अनागामी होतो. अनागामीला मरण आलें असतां तो इहलोकी जन्म घेत नाहीं. ब्रह्मलोकांत त्याचा जन्म होतो व तो तेथूनच मोक्ष मिळवितो. सर्व संयोजनांच्या नाशानें मनुष्य अरहा (अर्हत्) होतो. अरहाला पुनर्जन्म नाही. जीवन्मुक्त म्हणतात तो तोच. बुद्ध आणि अरहा यांमध्यें थोडासा फरक आहे. बुद्धाला निर्वाणाचा साक्षात्कार स्वप्रयत्नानें होतो; परंतु अर्हताला तो दुसर्याचा उपदेश श्रवन करून होतो. एवढाच काय तो फरक. बाकी दोघांनांहि निर्वाणाचा साक्षात्कार याच जन्मीं घडतो.

निर्वाण:-  निर्वाणासंबंधानें पाश्चात्य पंडितांचे अनेक तर्क आहेत. कोणी म्हणतो निर्वाण म्हणजे अभावमात्र (Annihilation), दुसरें कांही नाहीं. दुसरा कोणी म्हणतो हें कांहीं ठीक नाहीं. बौद्धांची एवढी मोठी संख्या आहे; ते सारे अभावालाच भजतील हे संभवनीय नाहीं. बुद्ध भगवान अक्रियावादी (Annihilationist) आहे.  असा आरोप त्याचे विरोधी त्याजवर त्याच्या ह्यातींतच आणीत असत. यासंबधीं एकदां वज्जींचा सेनापति सिंह यानें त्यास प्रश्न विचारला असतां तो म्हणाला:-  सिंहा, हा आरोप एका अर्थी खरा आहे. सर्व पापविचारांची (अकुशल संस्कारांची) अक्रिया मला पसंत आहे. त्यांची अक्रिया करण्याविषयीं मी उपदेश करितों. म्हणून मला अक्रियावादी म्हटलें असतां चालेल. उलटपक्षी मी क्रियावादी (Realist) आहें असेंहि कोणी म्हणूं शकेल. कारण पुण्यविचारांची (कुशल संस्कारांची) क्रिया मला पसंत आहे. त्यांची क्रिया करावी, त्यांनां पूर्णत्वाला न्यावें, असा मी उपदेश करितों; म्हणून मला क्रियावादी म्हटलें तरी हरकत नाहीं.१ (१ हा संवाद महावग्गांत आणि अंगुत्तर निकायात आहे.)’ या संवादावरून बुद्धानें अभावमात्र प्राप्त करून घेण्याचा उपदेश केला नाहीं, हे स्पष्ट होत आहे.

जम्बुखादक नांवाच्या परिवाजकानें सारिपुत्रांला, निर्वाण हें काय आहे, असा प्रश्न केला. तेव्हां सारिपुत्र त्याला म्हणाला:- . यो खो आवुसो रागक्खयो दोसक्खयो मोहक्खयो इदं वुच्चति निब्बाणं. लोभ, द्वेष आणि मोह यांना जो क्षय त्याला निर्वाण म्हणतात. २ (२ जम्बुखादक संयुत्त, संयुत्तनिकाय).

याचा अर्थ असा, कीं लोभ, द्वेष आणि मोह हे तीन मनाचे अकुशल धर्म (संस्कार) नष्ट झाले म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार होतो. लांकडाचा गाभा कोणता? असा जर प्रश्न केला तर त्याला ‘वरची साल काढा, नंतर, मऊ भाग तासून टाका; म्हणजे जो बाकी राहील तोच गाभा, हेंच उत्तर देणें योग्य होईल.’ सारिपुत्तानें जम्बुखादकाला अशाच प्रकारचें उत्तर दिलें आहे. अनेक नांवांनी निर्वाणाचा उल्लेख केला आहे. परंतु त्याचें विस्तृत वर्णन कोठेंच आढळत नाही. जसें एखाद्या गावांचे वर्णन देता येईल. तसे ते निर्वाणाचें देता येणे शक्य नाहीं. ज्यांच्या अंत:करणांतून लोभ, द्वेष, मोह समूळ नष्ट झालें, म्हणजे ज्यांच्या वासनेचा क्षय झाला, अशा महर्षीलाच निर्वाणाचा साक्षात्कार होतो. तें काय आहे हें तेच जाणं शकतात.