बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 21

‘‘हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनीं गृहस्थानें उत्तर दिशा जे आप्तमित्र त्यांची पूजा करावी:- (१) त्यांनां देण्यासारख्या असतील त्या वस्तु द्याव्या; (२) ते घरी आलें तर त्यांच्याशी प्रियभाषण करावें; (३) त्यांचें काम पडल्यास तें करावें; (४) आपणासारखेंच त्यांनां लेखावें (म्हणजे लग्नकार्यात व इतर ठिकाणीं ते आपणापेक्षा मानानें कमी आहेत, असें समजून त्यांचा अपमान करूं नये); (५) त्यांच्याशीं निष्कपट वर्तन ठेवावें. या पांच गोष्टींनी जर गृहस्थानें उत्तर दिशा जे आप्तमित्र त्यांची पूजा केली तर ते त्या गृहस्थास पांच प्रकारांनीं उपकारक होतात:- (१) हा बेसावध असतां एकाएकीं याच्यावर कांहीं संकट आलें तर त्या वेळीं त्याचें ते रक्षण करितात; (२) अशा प्रसंगी त्याच्या संपत्तीचेंहि ते रक्षण करितात; (३) संकटामुळे हा घाबरून जातो तेव्हां ते त्याला धीर देतात; (४) विपत्ति आली तरी ते त्याला सोडीत नाहींत; आणि (५) त्याच्या संततीवरसुद्धां ते उपकार करितात. या प्रकारें उत्तरदिशा त्या गृहस्थाला कल्याणकारक होते.

‘‘हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनीं धन्यानें खालची दिशा जे सेवक त्यांची पूजा करावी:- (१) त्यांच सामर्थ्य पाहून त्यांनां काम सांगावें; (२) त्यांनां योग्य वेतन द्यावें; (३) आजारी पडले तर त्यांची शुश्रूषा करावी; (४) वारंवार त्यांना उत्तम भोजन द्यावें आणि (५) उत्तम कामाकरिता त्यांना बक्षिस द्यावें. या पांच गोष्टींनी खालची दिशा जे सेवक त्यांची जर धन्यानें पूजा केली, तर ते पांच प्रकारांनी त्याला उपकारक होतात:- (१) धनी उठण्यापूर्वी ते उठतात; (२) धनी निजल्यावर निजतात; (३) धन्याच्या मालाची चोरी करीत नाहींत; (४) उत्तम तऱ्हेनें काम करतात; आणि (५) सर्वत्र धन्याची कीर्ति पसरवितात. याप्रमाणें केलेली खालच्या दिशेची पूजा सुखावह होते.

‘‘हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनी गृहस्थानें वरची दिशा जे साधुसंत त्यांची पूजा करावी:- (१) देहानें त्यांचा आदर करावा; (२) वाचेनें आदर करावा; (३) मनानें आदर करावा; (४) त्यांना काहीं लागल्यास द्यावें; आणि (५) भिक्षेला आले तर त्यांना आडकाठी आणूं नये. या पांच गोष्टींनीं जर वरची दिशा जे साधुसंत त्यांची गृहस्थानें पूजा केली तर ते त्याला पांच प्रकारांनी उपकारक होतात:- (१) पापापासून त्याचें निवारण करितात; (२) कल्याणकारक मार्गाला लावतात; (३) प्रेमपुरस्सर अनुग्रह करितात; (४) उत्तम धर्म शिकवितात; आणि (५) शंका निवारण करून मनाचें समाधान करितात. याप्रमाणें केलेली वरच्या दिशेची पूजा गृहस्थास हितावह होते.

‘‘हे गृहपतिपुत्र! दान, प्रियवचन, अर्थचर्या म्हणजे उपयोगी पडणें, आणि समानात्मता (दुसर्याला आपणासारखें लेखणें) अशीं हीं चार लोकसंग्रहाचीं साधनें आहेत. हीं साधनें जर आईबापांपाशीं नसतीं तर केवळ जन्म दिलें म्हणून मुलानें आईचा किंवा बापाचा गौरव केला नसता. ज्याला हीं चार  साधनें सांपडलीं तोच प्रपंचांत यशस्वी होतो.’’

हा बुद्धाचा उपदेश ऐकून सिगाल संतुष्ट झाला, आणि तेव्हांपासून तो बुद्धाचा उपासक बनला.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ सिगालसुत्ताचें हें रुपांतर मासिक मनोरंजनाच्या एप्रिल १९०९ च्या अंकांत छापलें होतें. ते संपादकांच्या परवनगीनें येथे घेतले आहे.)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------