बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 14

पूर्ण- भगवन्, कित्येक भिक्षु या शरीराला कंटाळून आत्मघात करितात, अशा शरीराचा जर सुनापरंतच्या रहिवाशांनीं नाश केला, तर त्यांनीं माझ्यावर उपकार केला असें होईल, आणि म्हणून ते लोक फार चांगलेच, असें मी समजेन.
बुद्ध- साधु (शाबास), पूर्णा साधु! अशा प्रकारच्या शमदमानें युक्त होत्साता तूं सुनापरंत प्रदेशांत धर्मोपदेश करण्यास समर्थ होशील.

(मज्झिमनिकाय)

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणसमयीं त्याच्या सारिपुत्तमोग्गल्लानादि प्रमुख शिष्यांपैकी महाकाश्यप हाच काय तो ह्यात राहिला होता. त्याच्या पूर्वाश्रमांतील चरित्रापासून बराच बोध घेण्यासारखा आहे, म्हणून त्याचें येथें दिग्दर्शन करणें अप्रशस्त होणार नाहीं. याचें पूर्वाश्रमांतील नांव पिप्फलि. त्याला गोत्रावरून काश्यप असें म्हणत. बुद्धाच्या शिष्यांपैकीं हा एक प्रमुख शिष्य होता, म्हणून त्याला महाकाश्यप असें म्हणत. मगध देशांतील महातीर्थ नांवाच्या ब्राह्मणग्रामांत एका श्रीमंत ब्राह्मण कुलांत त्याचा जन्म झाला. तो वीस वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईबापांनीं त्याचें लग्न करण्याचा बेत केला. परंतु पिप्फलीच्या मनांतून विवाहपाशांत बद्ध व्हावयाचें नव्हतें. आपल्या आईला त्यानें जेव्हां हा आपला विचार कळविला, तेव्हां तिला अत्यंत खेद झाला. शेवटीं आईच्या आग्रहास्तव तो लग्नाला कबूल झाला.

त्या वेळीं मद्रदेशांत शागल नगरींत एका कौशिकगोत्री श्रीमंत ब्राह्मणाला भद्रा कापिलानी नांवाची सोळा वर्षांची सुंदर कन्या होती. पिप्फलीच्या आईबापांनी तिच्याशी पिप्फलीचा विवाह करावा, असें ठरविलें. हें वर्तमान पिप्फलीला समजल्याबरोबर त्यानें तिला लिहिलें कीं:- “भद्रे, तूं आपल्या जाति-गोत्र संपत्ति यास अनुरूप असा दुसरा कोणी तरी पति वर. मी कधींना कधी गृहत्याग करून संन्यासी होईन. मागाहून तुझ्यावर पश्चाताप करण्याची पाळी येऊ नये, म्हणून हें लिहिलें आहे.”

भद्रेच्याहि मनांत भिक्षुणी व्हावयाचें होतें, म्हणून तिनें वरील अर्थाचेंच पत्र पिप्फलीला लिहिलें. ही दोन्ही पत्रें त्यांच्या आप्तांनीं त्यांनां मिळूं न देतां फाडून टाकिली, व दुसरीं बनावट पत्रें करून त्यांनां दिलीं. अर्थात् लग्नाचा विचार नसतांच त्या दोघांवर लग्न करण्याची पाळी आली. परंतु लग्न झाल्यावरहि या दोघांनी आपलें ब्रह्मचर्यव्रत कायम ठेवलें होतें. पिप्फलीचे आईबाप निवर्तल्यावर त्यांनें गृहत्याग केला व तो बुद्धाचा शिष्य झाला. भद्रा कापिलानीनेंहि त्याच्या मागोमाग भिक्षुणीसंघांत प्रवेश केला.१ (१ ही गोष्ट बुद्धघोषाचार्यकृत मनोरथपूरणी (अंगुत्तरनिकायठ्ठकथा) नामक ग्रंथांतून घेतली आहे. त्रिपिटकांत ही सापडत नाही.) पुढें अर्हत्पद प्राप्त झाल्यावर भद्रेनें म्हटलें आहे,

दिस्वा आदीनवं लोके उभो पब्बजिता मयं।
त्यम्हि खीणासवा दन्ता सीतीभूताम्ह निब्बुता।।


या प्रपंचांत दोष दिसून आल्यावरून आम्ही उभयतांनी प्रवज्या घेतली. आतां आम्ही दान्त झालों आहों, शांत झालों आहों, आमच्या वासनेचा क्षय झाला आहे, आम्ही निर्वाणपदाला पोहोंचलों आहों!

(थेरीगाथा चतुक्कनिपात.)