बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 12

पुण्णिका म्हणाली:-

कोनु ते इदमक्खासि अजानन्तस्सजानको।
दकाभिसेचना नाम पापकम्मा पमुच्चति ।।१।।
सग्गं नून गमिस्सन्ति सब्बे मंडूककच्छपा।
नागा च सुंसुमारा च ये चञ्ञे उदके चरा।।२।।
ओरब्भिका सूकरिका मच्छिका मिगबंधका।
चोरा च वज्झघाता च ये चञ्ञो पापकम्मिनो।।
दूकाभिशेचना तेपि पापकम्मा पमुच्चरे।।३।।


(१) हे ब्राह्मणा, स्नानानें पापापासून मुक्त होतो हें तुला अजाणाला कोणी अजाणानें सांगितलें? (२) बेडुक, कांसव, सर्प, मगर इत्यादि पाण्यांत राहणारे सर्व प्राणी स्वर्गासच जाणार आहेत काय? (३) बकरे मारणारे, डुकरें मारणारे, मासे मारणारे कोळी, पारधी, चोर, फांशीची शिक्षा झालेले मनुष्य हे आणि दुसरे पापी लोक स्नानानेंच पापकर्मांपासून मुक्त होतील काय?

सचे इमा नदियो ते पापं पुब्बे कतं वहुं।
पुञ्ञंपिमा वहेय्युं ते तेन त्वं परिबाहिरो।।४।।
यस्स ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरि।
तमेव ब्रह्मे मा कासि मा ते सीतं छबिं हने।।५।।

(४) हे ब्राह्मणा, या नद्या जर तुझें पाप वाहून नेतील, तर त्याबरोबर पुण्यहि वाहून नेतील. मग पुण्यालाहि तूं मुकशील! (५) म्हणून हे ब्राह्मणा, ज्या पापाच्या भयानें तूं नित्य या पाण्यांत उतरतोस, तेंच तूं करूं नकोस; व्यर्थ थंडीनें तुझ्या अंगाला बाधा कां करून घेतोस?

हा पुण्णिकेचा उपदेश ऐकून ब्राह्मण संतुष्ट होऊन एक वस्त्र घेऊन तिजपाशीं आला, आणि तिला म्हणाला, “भवति पुण्णिके, कुमार्गापासून सन्मार्गाकडे तुं मला वळविलेस; म्हणून हें वस्त्र मी तुला देतों.”

पुण्णिका म्हणाली:-

तय्हेव साटको होतु नाहमिच्छामि साटकं।
सच भायसि दुक्खस्स सचे ते दुक्खमष्पियं।।
माकसि पापकं कम्मं आवि वा यदि वा रहो।।१।।
सचे च पापकं कम्मं करिस्ससि करोसि वा।
न ते दुक्खा पमुत्यत्थि उपेच्चापि पलायतो।।२।।
सचे भायसि दुक्खस्स सचे ते दुक्खमप्पियं।
उपेहि बुद्धं सरणं धम्मं संघ च तादिनं।।
समादियाहि सीलानि तं ते अत्थाय हेहिति ।।३।।


(१) हे ब्राह्मणा, तुझें वस्त्र तुझ्याच जवळ ठेव. मी तें इच्छीत नाहीं. तूं जर दु:खास भितोस, तुला जर दु:ख अप्रिय आहे, तर एकांती किंवा लोकांतीं पापकर्म करूं नकोस. (२) जर तूं पापकर्म करीत आहेस, किंवा करशील, तर कोठेंहि पळून गेलास तरी दु:खापासून तुझी मुक्तता होणार नाही! (३) जर तूं दु:खाला भितोस, दु:ख जर तुला अप्रिय आहे, तर तूं बुद्धाला शरण जा, धर्माला शरण जा, आणि अर्हन्तांच्या संघाला शरण जा. शीलाचे नियम पाळ. यानेंच तुझे हित होईल.”

या उपदेशानें तो ब्राह्मण बौद्धमतानुयायी झाला. पुढें तो मोठा साधु झाला. तेव्हां त्यानें हे उद्गार काढिले.

ब्रह्मबंधु पुरे आसिं अज्जम्हि सच्चब्राह्मणो।
तेविज्जो वेदसंपन्नो सोत्थियो चम्हि न्हातको।।


पूर्वी मी केवळ नावाचा ब्राह्मण होतो. परंतु आतां मी खरा ब्राह्मण झालों. कारण आतां त्रैविद्या (बौद्धधर्मांत सांगितलेल्या तीन विद्या जाणणारा) आहे, मी वेदसंपन्न  (ज्ञानसंपन्न) आहें, मी पुरोहित (स्वस्तिसुखाचा लाभी) आहें, मी स्रातक (मुक्त) आहे¡