बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 10

मंगलसुत्तांत आणि सिगालसुत्तांत गृहस्थांनीं गृहिणींचा आदर करण्याविषयीं बुद्धानें उपदेश केला आहे. अनाथपिंडिक इत्यादि गृहस्थांनीं आपल्या गुणांनी उपासकवर्गांत जसें अग्रस्थान मिळविलें होतें, तसेंच उपासिकावर्गात विशाखा प्रभृति गृहिणींनी मिळविलें होतें. नकुलमाता नांवाच्या एका प्रमुख उपासिकेनें आपल्या पतीस केलेला उपदेश आपण ऐकाल तर तिला उपासिकावर्गांत अग्रस्थान कां मिळालें होतें, याची आपणांस कल्पना करतां येईल, म्हणून त्या उपदेशाचा सारांश येथें देतों.

भर्गदेशांत शिशुमारगिर या ठिकाणी भगवान बुद्ध रहात होता. तेथें त्या वेळीं नकुलपिता नांवाचा गृहस्थ फार आजारी होता. त्याचा मरणकाळ समीप आहे असें सर्वांस वाटत होतें. तेव्हां त्याची पत्नी त्याला म्हणाली- ‘हे गृहपति, प्रपंचासक्त होऊन तूं मरतां कामा नये. अशा प्रकारचें सापेक्ष (प्रपंचाच्या तळमळीनें आलेलें) मरण दु:खकारक आहे, असे भगवंतानें सांगितलें आहे. हे गृहपति, कदाचित् तुझ्या मनांत अशी शंका येईल की, ‘मी मेल्यावर, नकुलमाता मुलांचे पालन करूं शकणार नाहीं, प्रपंचाचा गाडा हाकूं शकणार नाहीं.’’ परंतु गृहपति, अशी शंका तूं मनामध्यें आणूं नकोस. कारण मला कापसाचें सूत काढण्याची कला माहिती आहे, व मला लोंकर तयार करतां येत आहे. या कलेनें मी तुझ्या मरणानंतर मुलांचें पोषण करूं शकेन. म्हणून हे गृहपति, प्रपंचाची तळमळ मनामध्यें ठेवून तुला मरण येऊं नये, असें माझें म्हणणें आहे. हे गृहपति, दुसरी तुला अशी शंका येण्याचा संभव आहे कीं, ‘नकुलमाता माझ्या पाठीमागें पुनर्विवाह करील.’ परंतु ही शंका तूं सोडून दे. मी आज सोळा वर्षे गृहस्थब्रह्मचर्य (उपोसथव्रत) पाळीत आहें हें तुला ठाऊकच आहे. मग मी तुझ्या मृत्यूनंतर पुनर्विवाह कसा करीन?  हे गृहपति, तुझ्या मरणानंतर मी बुद्ध भगवंताचा आणि भिक्षकसंघाचा धर्मोपदेश श्रवण करण्यास जाणार नाहीं अशी तुला शंका येण्याचा संभव आहे; पण तुझ्या मार्गे पूर्वीप्रमाणेंच बुद्धोपदेश ऐकण्याच्या कामीं माझा आदर राहील, अशी तुझी पक्की खात्री असूं दे; आणि म्हणून तळमळींवाचून तुला मरण येऊं दे. हे गृहपति, तुझ्या पाठीमागें मी बुद्धोपदिष्ट शीलाचें यथासांग पालन करणार नाहीं, अशी तुला शंका येण्याचा संभव आहे. पण ज्या उत्तम शीलवती बुद्धोपासिका आहेत, त्यांपैकीं मीहि एक आहें, हें तूं खात्रीनें समज;  आणि म्हणून तळमळीवांचून तुला मरण येऊं दे. हे गृहपति, मला समाधिलाभ झाला नाहीं- अतअव तुझ्या मरणानें मी फार दु:खी होईन- असें तू समजूं नकोस. ज्या कोणी बुद्धोपासिका समाधिलाभिनी असतील, त्यांपैकी मी एक आहें असें तूं समज, आणि मनाची तळमळ सोडून दे. हे गृहपति, बौद्धधर्माचें तत्त्व मला अद्यापि समजलें नाहीं अशीहि तुला कदाचित शंका येईल, परंतु ज्या कोणी तत्त्व उपासिका असतील त्यांपैकींच मी एक आहें, हें तूं पक्कें ध्यानांत ठेव, आणि मनाची तळमळ टाक.’’ या नकुलमातेच्या सांत्वनानें नकुलपित्याच्या मनाचें समाधान झालें आणि त्याचा तो आजार लवकरच शमला. आजारांतून बरा झाल्यावर तो बुद्धदर्शनास गेला. तेथें बुद्धानें त्याला म्हटले “हे गृहपति, तूं मोठा पुण्यवान आहेस; नकुलमातेसारखी उपदेश करणारी आणि तुझ्यावर प्रेम करणारी पत्नी तुला मिळाली आहे. हे गृहपति, उत्तम शीलवती अशा ज्या कांहीं उपासिका आहेत, त्यांपैकीं ही एक आहे. अशी पत्नी तुला सांपडली हें तुझें भाग्य होय!”

या एका उदाहरणावरून बुद्ध भगवंताला स्त्रियांची योग्यता किती वाटत होती हें आपणास समजून येणार आहे. आणखीहि कांहीं उदाहरणें त्रिपिटक ग्रंथांतून दाखवितां येण्यासारखीं आहेत; परंतु अवकाश नसल्यामुळें एवढ्यानेंच समाधान मानणें भाग आहे.

स्त्रीस्वातंत्र्य जर बुद्धाला पसंत होतें, तर भिक्षुणींसाठीं त्यानें कडक नियम केले हें कसें? याचें उत्तर थोडक्यांत द्यावयाचें म्हटलें म्हणजे, त्या कालच्या समाजपरिस्थित्यनुरूप हे नियम बुद्धाला करावे लागले हें होय. उदाहरणार्थ भिक्षुणीनें एकटे राहूं नये असा बुद्धानें नियम केला. असा निर्बंध भिक्षूंस नव्हता. अर्थात् हा नियम स्त्री स्वातंत्र्यविधातक आहे. असें सकृद्दर्शनीं कोणत्याहि वाटण्याचा संभव आहे. पण त्या कालच्या समाजरचनेकडे लक्ष्य दिलें असतां हा नियम योग्य होता असेंच म्हणावें लागेल. हें शुभा नांवाच्या भिक्षुणीच्या गोष्टीवरून स्पष्टपणें समजून येण्यासारखें आहे.