बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 8

बिंबिसार राजाचा पुत्र अजातशत्रु हा देवदत्ताचा भक्त होता. स्वत: त्यानें आपल्या बापाला ठार मारून गादी मिळविली होती; व बुद्धाला ठार मारून देवदत्ताला बुद्धपद मिळवून देण्याच्या कामी मदत करण्याचें त्यानें अभिवचन दिलें होते. कांही मारेकरी पाठवून बुद्धाला ठार मारण्याचा त्याने प्रयत्न करून पाहिला, परंतु तो सिद्धीस गेला नाही. उलट ते मारेकरी बुद्धाचेच उपासक झाले. तेव्हां देवदत्तानें बुद्धभगवान राजगृहांत भिक्षेसाठी फिरत असतां त्याजवर नाळागिरि नांवाचा मस्त हत्ती सोडिवला. बुद्ध भगवंतानें प्रेममय अंत:करणानें त्याजकडेस पाहिलें. तो कांहीएक इजा न करतां सरळ बुद्धापुढें जाऊन उभा राहिला व त्याची पायधूळ त्यानें आपल्या मस्तकावर टाकिली. तेथून तो सरळ हस्तिशाळेंत आपल्या ठिकाणावर जाऊन उभा राहिला. हें परम आश्चर्य पाहून राजगृहवासी लोक फारच चकित झाले, व ते म्हणूं लागले कीं,

दण्डेनेके दमयन्ति अंकुसेहि कसाहि च ।
अदण्डेन असत्थेन नागो दन्तो महेसिना।।

कोणी काठीनें, कोणी अंकुशानें आणि कोणी चाबकानें (जनावराचें) दमन करितात. पण महर्षि बुद्धाने काठीवांचून किंवा कोणत्याहि शस्त्रावांचून हत्तीचें दमन केलें!

अशा प्रकारचे बुद्धाला मारून आपण बुद्ध होण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यावर देवदत्तानें बौद्धसंघांत भेद उत्पन्न करण्याची एक नवीन युक्ति शोधून काढिली. देहदंडनाला मदत होईल अशा रीतीचे नवीन नियम भिक्षुसंघासाठी बुद्ध भगवान् करणार नाहीं हें त्याला पक्कें माहीत होतें; आणि कांही लोक देहदंडन करणारांना भुलून जाऊन त्यांच्या नादीं लागतात हेंहि त्याला माहीत होतें, म्हणून त्यानें अशी युक्ति योजिली कीं, बुद्धाजवळ जाऊन त्याची सम्मति मिळणार नाहीं, असे कांही नवीन नियम संघाला घालून देण्यास त्यास सांगावें, व त्यानें ही गोष्ट अमान्य केली म्हणजे तो लोकांना पूर्ण वैराग्य शिकवीत नाहीं असा बोभाटा करून संघांतील कांही भिक्षूंना आपल्या नादीं लावावें. ही युक्ति त्यानें कोकालिक व समुद्रदत्त या संन्यासी सहायांस कळिवली, व आपल्या मताचे जेवढं लोक होते, तेवढे गोळा करून तो बुद्धाजवळ गेला. बुद्धाला नमस्कार करून एका बाजूस बसल्यावर तो म्हणाला- “भगवन्, आपण अल्पेच्छ आणि संतुष्ट मनुष्यांचे गुण वर्णन करतां, तेव्हां हे नवीन पांच नियम भिक्षुसंघानें पाळण्यासाठी आपण घालून द्यावें, कारण हे पांच नियम अल्पेच्छता आणि संतोष वाढवितील. (१) भिक्षूंनी यावज्जीव अरण्यांतच रहावें, जो भिक्षु गावांत वस्ती करील त्याला दोषी ठरवावें. (२) भिक्षूंनी यावज्जीव भिक्षान्नावरच निर्वाह करावा. जो आमंत्रण घेऊन जेवावयास जाईल त्यास दोषी ठरवावें. (३) भिक्षुंनी यावज्जीव रस्त्यांत वगैरे पडलेल्या चिंध्या गोळा करून त्यांनी बनविलेल्या चीवरावरचा निर्वाह करावा. जो भिक्षू गृहस्थानें दिलेलें वस्त्र घेऊन त्याचें चीवर करील त्याला दोषीं ठरवावें. (४) भिक्षूंनी यावज्जीव वृक्षाखालीं वास करावा. जो भिक्षु आच्छादित (झोंपडी वगैरे) ठिकाणीं वास करील त्याला दोषी ठरवावें. (५) भिक्षूंनी यावज्जीव मासे आणि मांस खाऊ नये. जो भिक्षू मत्स्य- मांस खाईल, त्याला दोषी ठरवावें.”

बुद्ध भगवान् म्हणाला:- “देवदत्ता, या नवीन नियमांची कांहीं जरुरी नाहीं. ज्याची इच्छा असेल त्यानें अरण्यांतच रहावें, आणि नसेल त्यानें गावाजवळ रहावें. ज्याची इच्छा असेल त्यानें भिक्षेवरच निर्वाह करावा, आणि नसेल त्यानें आमंत्रण केलें असतां जेवावयास जावें. ज्याची इच्छा असेल त्यानें चिंध्यांच्या चीवरावरच निर्वाह करावा, नसेल त्याला गृहस्थानें दिलेल्या वस्त्राचें चीवर शिवण्यास हरकत नसावी. पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून आठ महिने वृक्षाखाली रहाण्यास मी परवानगी दिलीच आहे. भिक्षान्न तयार करण्यासाठीं हे प्राणी मारले आहेत असें जर भिक्षूनें पाहिलें, ऐकिलें, किंवा अशी त्याला शंका आली, तर त्या माशांचें आणि मांसाचें त्यानें ग्रहण करूं नये, नाहीतर ग्रहण करण्यास हरकत नाहीं.”