बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 6

उ.- होय महाराज.

भि.- संघांत प्रवेश केलेल्या भिक्षुनें चोरी करतां कामा नये. गवताची काडीसुद्धां त्यानें दिल्यावांचून घेतां कामा नये. जो भिक्षु.. चोरी करील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल.. म्हणून यावज्जीव ही गोष्ट तूं करता कामा नये.

उ.- होय महाराज.

भि.
- संघात प्रवेश केलेल्या भिक्षुनें जाणूनबुजून प्राणघात करतां कामा नये. त्यानें किडा, मुंगी देखील मारतां कामा नये. जो भिक्षु जाणूनबुजून गर्भावस्थेंतील देखील मनुष्य प्राण्याला ठार मारील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल.. म्हणून यावज्जीव ही गोष्ट तूं करता कामा नये.

उ.-
होय महाराज.

भि.
- संघात प्रवेश केलेल्या भिक्षूनें आपणास ध्यानसमाधि प्राप्त झाल्याच्या वल्गना करतां कामा नये. एकांतांतच राहण्यांत मला आनंद वाटतो. अशी प्रौढी देखील त्यानें सांगतां कामा नये. जो भिक्षु पापी इच्छेंने तृष्णावश होऊन आपणास ध्यानसमाधि प्राप्त झाल्याच्या खोटय़ा गप्पा (लोकांस) सांगेल, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल.. म्हणून यावज्जीव ही गोष्ट तूं करतां कामा नये.

.- होय महाराज

या उपसंपदाविधीच्या संक्षिप्त वर्णनावरून भिक्षूस मुख्यत: कोणकोणते नियम पाळावे  लागतात याची आपणास थोडीबहुत कल्पना करतां येईलच. आता  श्रामणेर म्हणजे काय? हें थोडक्यांत सांगतों.

बुद्ध भगवान् कांही काल राजगृहात राहून तेथून धर्मोपदेश करीत करीत कपिलवस्तु नगरीस गेला. तेथें तो निग्रोधाराम नांवाच्या विहारांत राहत होता. एके दिवशी  भिक्षेसाठी कपिलवस्तु नगरींत त्यानें प्रवेश केला व तो फिरत फिरत शुद्धोदन राजाच्या घरीं गेला. तेथें त्याला बसण्यासाठी मांडलेल्या आसनावर तो बसला असतां राहुलाच्या आईनें (बोधिसत्त्वाच्या पत्नीनें) त्याला पाहिलें, व ती राहुलकुमारास म्हणाली “बाळ, हा पहा तुझा बाप. त्याच्या जवळ जाऊन तुझा हिस्सा (दायभाग) माग!” हे आईंचे शब्द ऐकून राहुल बुद्धासमोर जाऊन उभा राहिला. बुद्ध भगवान् कांही वेळानें आसनावरून उठून चालता झाला. राहुलहि त्याच्या मागोमाग ‘मला माझा हिस्सा द्या.’ असें म्हणत चालला. विहारांत गेल्यावर बुद्ध भगवंतानें सारिपुत्राला बोलावून- पैतृक धन देण्याच्या उद्देशानें- राहुल-कुमारास संन्यास देण्यास सांगितलें. राहुलाच्या वयास वीस वर्षे झालीं नव्हतीं म्हणून त्यास श्रामणेर करण्यांत आलें. तेव्हांपासून श्रामणेर करण्याची पद्धत सुरू झाली.

श्रामणेरानें स्वतंत्र राहतां कामा नये. भिक्षूंच्या आश्रयानेंच राहिलें पाहिजे. त्याला दीक्षा देते वेळी त्याचें मुंडन करितात;  नंतर काषायवस्त्रें  घेऊन तेथें जमलेल्या भिक्षुंला नमस्कार करून तो पुढील वाक्य त्रिवार उच्चारितो-

सब्बदुक्खनिस्सणनिब्बानसच्छिकरणत्थं इदं कासावं गहेत्वा पब्बाजेथ मं भन्ते अनुकंपं उपादाय।