बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*संघ 1

संघ
(भाग १ ला)

बुद्धानें धर्मोपदेशास सुरुवात करण्यापूर्वी उत्तर हिंदुस्तानमध्यें निरनिराळ्या पंथांचे अनेक श्रमण (संन्यासी) होते. एकेका पंथाच्या श्रमण लोकांच्या समुदायास संघ किंवा गण असे म्हणत असत. अशा कित्येक संघांच्या त्रिपिटक ग्रंथांत उल्लेख सापडतो, परंतु त्यांची विशेष माहिती उपलब्ध नाहीं. बुद्धानें स्थापिलेल्या संघाचा मात्र विस्तृत वृत्तांत विनयग्रंथांत उपलब्ध आहे. त्यांतील थोडासा भाग बौद्ध संघाची माहिती देण्यासाठी आज मी आपणांसमोर ठेवीत आहे.

बुद्ध भगवंतानें ऋषिपत्तन नांवाच्या प्रदेशांत राहत असतां आपले पूर्वीचे सहाय पांच भिक्षु यांस उपदेश करून आपले अनुयायी केल्याची हकिगत पहिल्या व्याख्यानांताच आलीच आहे. या पांच भिक्षुंपैकीं कौण्डिन्य हा बुद्धाचा पहिल्या शिष्य झाला. तद्नंतर वप्प (वप्न) आणि भद्दिय (भद्रिय) हे दोघे व तदनंतर महानाम व अस्सजि (अश्वजित) हे दोघे शिष्य झाले. ते सर्व जातीनें ब्राह्मण होते. बुद्ध भगवान आणि हे त्यांचे पांच शिष्य ऋषिपत्तनांत रहात असत. त्या वेळी जवळ असलेल्या वाराणसी नगरीत यश नांवाचा एक श्रीमंत व्यापार्‍याचा मुलगा रहात होता. त्याला राहण्याकरितां त्याच्या बापानें एक उन्हाळ्यासाठीं, एक पावसाळ्यासाठी व एक हिवाळ्यासाठी असे तीन वाडे बांधले होते. परंतु यशाला या वैभवानें कांही सुख झालें नाहीं. त्याला सर्वत्र दु:खच नांदत आहे असें वाटावयास लागलें. एके दिवशी रात्री ‘अहो दु:खं, अहो कष्टं’ असें म्हणत तो आपल्या वाड्यांतून बाहेर पडला आणि जेथें बुद्ध राहत होता तेथें गेला. पहाटेच्या प्रहरी बुद्ध भगवान् इकडून तिकडे चंक्रमण करीत होता, त्यानें यशास पाहिलें. यश पुन: ‘उपद्रुतं बत भो उपसृष्टं बत भो’ (अहो सर्वत्र उपद्रव आहे, सर्वत्र उपसर्ग आहे) असे ओरडला. तें ऐकून बुद्ध भगवन् म्हणाला, ‘यशा, येथें उपद्रव नाहीं. येथें उपसर्ग नाहीं.’ तेव्हां यश बुद्धाजवळ जाऊन बसला, त्यानें भगवंताच्या उपदेशश्रवणानें तेथल्या तेथें निर्वाणपद प्राप्त करून घेतलें, व भिक्षुसंघांत प्रवेश केला.

दुसर्‍या दिवशी यशाचा बाप त्याचा शोध करीत ऋषिपत्तनांत आला. त्यानें बुद्धाला यशास पाहिलं आहे काय? असा प्रश्न केल्यावर बुद्ध त्याला म्हणाला, ‘‘हे गृहपति, तूं घाबरू नकोस, यशाला तूं या ठिकाणींच पाहशील.’’ हें ऐकून त्याला धीर आला, व तो बुद्धाच्या बाजूस एका आसनावर बसला. तेव्हा बुद्धानें त्याला धर्मोपदेश केला. ते ऐकून त्याच्या मनामध्यें पूर्ण वैराग्य उत्पन्न झालें. आणि तो बुद्धाच्या ताबडतोब उपासक झाला. तेव्हां बुद्धानें त्याची आणि यशाची तेथल्या तेथे गांठ घालून दिली. यशानें संसारत्याग केला याबद्दल त्याच्या बापास कांहीच वाईट वाटले नाहीं, कारण बुद्धोपदेशानें त्याच्या मनांत तसाच प्रकाश पडला होता. तो बुद्धाला म्हणाला, ‘भगवन्, यशाची आई यशास पाहण्यास फार उत्सुक झाली आहे. ती त्यासाठीं फार शोक करीत आहे. तेव्हा कृपा करून आपण यशास बरोबर घेऊन उद्यां आमच्या घरी भोजनास यावें.’ बुद्ध यशास बरोबर घेऊन दुसर्‍या दिवशी त्या व्यापार्‍याच्या घरीं गेला. तेथें त्यानें यशाच्या आईला व पूर्वाश्रमांतील बायकोला धर्मोपदेश केला. त्या उपदेशानें त्यांच्या मनांत प्रकाश पडला. त्या दोघी तत्काल बौद्ध उपासिका झाल्या. अर्थात् यशाच्या गृहत्यागाबद्दल त्यांनां कांही वाईट वाटलें नाहीं.

यश भिक्षु झाला, हें वर्तमान जेव्हाव विमल, सुबाहु, पूर्णजितू आणि गवंपति या त्याच्या चार मित्रांनी ऐकिलें, तेव्हां ते ऋषिपत्तनांत जाऊन यशास भेटले. यशानें त्यांना बुद्धाजवळ नेलें. बुद्ध भगवंताच्या उपदेशानें त्यांच्या मनात प्रकाश पडला व त्यांनी तेथल्यातेथेंच भिक्षुसंघात प्रवेस केला. ही गोष्ट त्या प्रांतातील यशाच्या पन्नास मित्रांस समजल्यावर त्यांनीहि ऋषिपत्तनांत बुद्धाची भेट घेऊन बौद्धसंघांत प्रवेश केला. याप्रमाणें भगवान् ऋषिपत्तनांत राहत असतां त्याजपाशी साठ भिक्षूंचा संघ जमला. हे सगळे  भिक्षु अर्हत्पदाला पावले होते. त्यांना एकत्र जमवून बुद्ध  म्हणाला :- ‘भिक्षु हो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशांतून मी मुक्त झालों आहें, आणि भिक्षु हो, तुम्हीहि या पाशांतून मुक्त झालां आहांत. तेव्हां आतां, भिक्षु हो, बहुजनांच्या हितासाठी पुष्कळांच्या सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गानें दोघे जाऊं नका. प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणपद व शेवटी कल्याणप्रद अशा या धर्ममार्गाचा उपदेश करा.’’