बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


बुद्ध 11

बुद्ध भगवान पहांटेस उठत असे. त्या वेळीं तो ध्यान करी किंवा विहाराच्या बाहेरच्या बाजूस चक्रमण (इकडून तिक़डे शांतपणें फिरणें) करी. सकाळी उठून भिक्षेसाठीं तो गांवात प्रवेश करी, तेथें कोणी कांही प्रश्न विचारला तर त्याचें त्याला उत्तर देई व मग त्याला उपदेश करून सन्मार्गाला लावी. कृषिभारद्वाज, शृगाल, इत्यादिकांना त्यानें अशाच प्रसंगी उपदेश करून सन्मार्गाला लाविलें. भिक्षापात्रांत शिजविलेल्या अन्नाची जी भिक्षा एकत्र होई ती घेऊन तो विहारांत परत येत असे, व दुपारचें बारा वाजण्यापूर्वी भोजन करीत असे. भोजनोत्तर थोडीशी विश्रांति घेऊन ध्यान करीत असे. संध्याकाळी गृहस्थांला किंवा भिक्षूंला उपदेश करीत असे. रात्रीं पुन: ध्यान करीत असे अथवा चंक्रमण करीत असे. मध्यरात्रीच्या सुमारास तो उजव्या कुशीवर पायावर पाय ठेवून व उशीला हात घेऊन निजत असे. या त्याच्या निजण्याला सिंहशय्या असें म्हणतात. ज्या वेळीं तो प्रवासाला जाई त्या वेळीं बहुधा त्याच्याबरोबर भिक्षूंचा बराच मोठा समुदाय असे. तो सकाळीं एका गांवामध्ये भिक्षा ग्रहण करून दुसर्‍या गांवामध्ये रात्रीं मुक्कामाला जाई. जेथें विहार नसेल तेथें तो झाडाखाली किंवा एखाद्या बागेमध्यें राही. कोणी पूर्व दिवशी आमंत्रण केलें असतां भिक्षुसंघासह तो त्याच्या घरीं भिक्षाग्रहण करीत असे.

याप्रमाणें सतत ४५ वर्षे अनेक जनसमुदायावर आपल्या धर्मामृताचा वर्षाव करून वयाच्या ८० व्या वर्षी बुद्ध भगवान् कुसिनारा येथें परिनिर्वाण पावता झाला. क्षत्रियकुलांत त्याचा जन्म झाला असून परराष्ट्रांच्या विजयापेक्षा मनोविजय त्याला श्रेष्ठ वाटला. आपल्या शत्रूंस त्यानें शस्त्रांनीं न जिंकितां श्रद्धा, क्षांति आणि लोककल्याणाचा अप्रकंप्य उत्साह याच उपायांनी जिंकलें. ज्यानें मारास  जिंकलें तो काय न जिंकील?

सभ्य गृहस्थ हो, हें बुद्धरत्न या भारतभूमींत उत्पन्न झालें हें या भूमीचें मोठें भाग्य होय ! जगाच्या इतिहासात या रत्नांच्या योगें केवढा फेरफार झाला हें आपणास सांगण्याची आवश्यकता नाहीं. या सद्गुरूला, या जगद्गुरूला- तुकारामबोवांच्या म्हणण्याप्रमाणें या खर्‍या देवाला१

(१ सद्गुरूवांचोनि सांपडेना सोय। धरावे ते पाय आधीं त्याचे।।
आपणासारिखें करिती तात्काळ। कांही काळवेळ नलगे त्यांशी।।
लोहपरिसाची न साहे उपमा। सद्गुरूमहिमा अगाधची।।
तुका म्हणे ऐसें आंधळे हें जन। गेलें विसरून खर्‍या देवा।।)-


आम्ही गेलीं हजार वर्षे अगदींच विसरून गेलों होतों; परंतु पाश्र्चात्य पंडितांच्या परिश्रमानें या रत्नाची पारख आम्हांस हळूहळू  होत चालली आहे हें सुचिन्ह समजलें पाहिजे. या रत्नाचा उज्जवल प्रकाश आमच्या अंत:करणावर पडून आमचें अज्ञान नष्ट होईल, आमच्यांतील भेदभाव आम्ही विसरून जाऊं, व पुन: मनुष्यजातींचे हित साधण्यास समर्थं होऊं अशी आशा आहे. सरतेशेवटीं स्थविर अनिरुद्धाचार्य यांच्या वाणीनें मी अशी प्रार्थना करितों कीं,

भूतं भवभ्दावि च धर्मजातं।
योऽनन्यथा स्वयमबोधि सुबोधिमूले।
ज्ञेयोदये सुधिषणावरणानभिज्ञ:।
संबुद्ध एष भवतां भवताव्दिभूत्यै।।


भूत, भविष्य आणि वर्तमान धर्मतत्त्वें उत्तम बोधिवृक्षाखाली ज्यानें स्वत: यथार्थ जाणिलीं, व ज्ञेय तत्त्वांचा (अंत:करणांत) उदय होत असतां बुद्धीवर आवरण पडल्याचें ज्याला मुळीच माहीत नाहीं, असा हा संबुद्ध आपल्या कल्याणाला कारण होवो!