बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


बुद्ध 8

ज्या वेळी ध्यानस्थ आणि उत्साही अशा ब्राह्मणाला धर्मज्ञानाचा साक्षात्कार होतो, त्या वेळीं तो मारसेनेचा विध्वंस करून टाकतो, आणि अंतरिक्षांतील सूर्याप्रमाणे प्रकाशतो.

नंतर या नेरंजरा नदीच्या कांठावरील प्रदेशांत भगवान् रहात असतां, त्यांच्या मनांत असा विचार आला, कीं :-

किच्छेन मे अधिगतं हलं दानि पकासितुं।
रागदोसपरेतेहि नायं धम्मो सुसंबुद्धो ।।१।।
पटिसोतगामिं निपुणं गंभीरं दुद्दसं अणुं।
रागरत्ता न दक्खति तमोखन्धेन आवुता ति ।।२।।


(१) मोठ्या प्रयत्नानें या मार्गाचें ज्ञान मला झालें आहे. आतां तें लोकांला सांगण्यातं अर्थ दिसत नाहीं. कारण लोभानें आणि द्वेषानें
आहे. या श्लोकाचें संस्कृत रूपांतर ललितविस्तरांत दिलें आहे तें असें :-

या ते सेना धर्षयति लोकमेनं सदेवकं ।
मेत्स्यामि प्रज्ञया तां ते आमपात्रमिबाम्बुना ।।


भरलेले लोक तें लवकर जाणूं शकणार नाहींत. (२) हा मार्ग लोकप्रवाहाच्या उलट जाणारा आहे, हा ज्ञानयुक्त आहे, हा गंभीर आहे, हा दुरधिगम आहे. आणि हा सूक्ष्म आहे, (म्हणून) अज्ञानावरणानें आच्छादित व कामासक्त मनुष्यांला त्याचें ज्ञान होणार नाहीं!

भगवंताच्या मनांतील हा विचार ब्रह्मदेवानें जाणला, आणि तो आपल्याशींच म्हणाला, `अरेरे! बुद्धानें जर धर्मोपदेश केला नाही, तर लोकांची मोठी हानि होणार आहे!  लोकांचा नाश होणार आहे!’ असे उद्गार काढून ब्रह्मदेव एकदम बुद्धासमोर प्रगट झाला व त्याला म्हणाला :-

उठ्ठहि वीर विजितसंगाम सत्थवाह अनण विचर लोके।
देसेतु भगवा धम्मं अञ्ञातारो भविस्सन्ति।।१।।


हे वीर, हे सार्थवाह, आतां उठ, तूं संग्राम जिंकिला आहेस, तूं ऋणमुक्त आहेस; सर्वत्र संचार कर. हे भगवन, तूं लोकांनां धर्मोपदेश कर हा तुझा धर्म जाणणारेहि (कांहीं) असतीलच.

या ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेस अनुसरून बुद्धानें धर्मोपदेश करण्याचा निश्चय केला.

आतां हा ब्रह्मदेव कोण, हें येथें दिलेल्या उतार्यावरून किंवा महावग्गांतील कथेवरून समजणें अंमळ कठीण आहे. परंतु तेविज्जसुत्त, महागोविंदसुत्त इत्यादि सुत्तांतून जें त्याचें वर्णन सांपडतें, त्यावरून त्याची बरोबर कल्पना करतां येते.

मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा१ (१ मैत्री- सार्वत्रिक प्रेमभाव; करुणा = दया; मुदिता = आनंदीवृत्ति; उपेक्षा = परवा न करणें.) या चार भावनांला ब्रह्मविहार असें म्हणतात. करणीयमेत्तसुत्तांत म्हटलें आहे :-

माता यथा नियं पुत्तं आयुसा एकपुनमनुरक्खे।
एवं पि सब्बभूतेसु मानसं भावये अपरिमाणं ।।२।।


आई जशी एकुलत्या एका पुत्राचें आपले प्राण खर्ची घालूनहि परिपालन करते, त्याचप्रमाणें (त्यानें) आपलें मन सर्व प्राणिमात्रांविषयीं अपरिमित प्रेमानें भरून ठेवावें.