समाधिमार्ग

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.


अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5

मरणस्मृतीचे विधान अंगुत्तरनिकायाच्या छक्कनिपातांत (सुत्त नं. २०) सापडते.  त्या सुत्ताचा सारांश असा ः-

भगवान् म्हणाला, ''भिक्षुहो, मरणस्मृतीची भावना केली असता महत्फलदायक आणि निर्वाणाला नेणारी होते.  ती कशी ?  एखादा भिक्षु दिवस संपल्यानंतर रात्रीला आरंभ झाला असता असा विचार करतो की, पुष्कळ कारणांनी मला मरण येणे शक्य आहे.  मला एखादा साप, विंचू, किंवा शतपदी चावेल आणि त्यायोगे मरण येईल, आणि (धर्ममार्गात) अंतराय घडेल.  कदाचित् मी ठेच लागून पडेन, मला अजीर्ण होईल, पित्त, कफ आणि वात यांचा प्रकोप होईल, व या कारणांनी मला मरण येईल, आणि अंतराय घडेल.  त्याने असा विचार करावा की माझ्या अंतःकरणांत पापकारक अकुशल मनोवृत्ति अद्यापि आहेत की काय, ज्यांच्यायोगे आजच्या रात्री मरण आले असता मला अंतराय घडेल.  जर त्याला अशा मनोवृत्ति अंतःकरणात आहेत असे दिसून आले, तर त्यांच्या नाशासाठी त्याने अत्यंत प्रयत्‍न करावा, अत्यंत उत्साह बाळगावा, सावधपणे वागावे.  एखाद्या माणसाच्या वस्त्राने पेट घेतला किंवा त्याच्या डोक्यावर आग लागली, तर ती विझविण्यासाठी तो जसा अत्यंत प्रयत्‍न करील, अत्यंत उत्साह बाळगील, सावधपणे वागेल, त्याप्रमाणे या भिक्षूने वागावे.  पण जर त्याच्या अंतःकरणांत अशा मनोवृत्ति नसतील तर त्याने आनंदित व्हावे आणि कुशल मनोवृत्ति संपादण्याविषयी सदोदित दक्ष असावे.  रात्र संपल्यानंतर दिवसाला आरंभ झाला असता त्याने अशाच रीतीने मरणस्मृतीची भावना करावी.  याप्रमाणे भावना केली असता ती महत्फलदायक आणि निर्वाणाला पोचविणारी होते.''

या स्मृतिची तीव्रता कोठपर्यंत वाढवावी हे याच छक्कनिपाताच्या एकोणीसाव्या सुत्तांत दर्शविले आहे.  एके प्रसंगी भगवंताने मरणस्मृतीची स्तुति केली असता एक भिक्षु म्हणाला, ''भदंत, मी मरणस्मृतीची भावना करीत असतो.''  ''ती कशा प्रकारे ?'' असा भगवंताने प्रश्न केला, तेव्हा तो म्हणाला, ''मी जर सबंध दिवसरात्र जगलो, आणि भगवंताच्या धर्माचे चिंतन करू शकलो तर पुष्कळच झाले, असा मी विचार करतो, व याप्रमाणे मरणस्मृतीची भावना करतो.''  त्यावर दुसरा भिक्षु म्हणाला, ''भदंत, मी दिवसभर जगलो आणि भगवंताच्या धर्माचे चिंतन करू शकलो तर पुष्कळ झाले, असा विचार करतो, व याप्रमाणे मरणस्मृतीची भावना करतो.''  तिसरा म्हणाला, ''मी जेवण्याच्या काळापर्यंत जगलो आणि भगवंताच्या धर्माचे चिंतन करू शकलो तर पुष्कळ झाले, असा विचार करतो, व याप्रमाणे मरणस्मृतीची भावना करतो.''  पाचवा म्हणाला, ''भदंत, मी एक घांस खाईपर्यंत जगलो, भगवंताच्या धर्माचे...इत्यादि.''  सहावा म्हणाला, भदंत, मी आश्वास घेऊन प्रश्वास सोडीपर्यंत किंवा प्रश्वास सोडून आश्वास घेईपर्यंत जगलो व भगवंताच्या धर्माचे... इत्यादि.''  त्यावर भगवान् म्हणाला, ''पूर्वीचे चार भिक्षु निष्काळजीपणे वागतात असे म्हटले पाहिजे.  पण हे शेवटले दोन अप्रमत्तपणे वागत असून मरणस्मृतीची तीव्र भावना करीत आहेत असे समजावे.''

बुद्धघोषाचार्याने या मरणस्मृतीवर बराच विस्तार केला आहे.  तरी मुद्याच्या सर्व गाष्टी वरील दोन सुत्रांत आल्याच आहेत.  या स्मृतीने केवळ उपचारसमाधी साध्य होते.  तिच्यापासून मोठा फायदा हा की, मनुष्य अत्यंत कार्यदक्ष बनतो.  क्षणोखणी आपणाला मरण येण्याचा संभव आहे अशी स्मृति जागृत असली, तर कोणता सुज्ञ मनुष्य आळसात संतोष मानील ? किंवा आपल्या मनातील पापमळ धुऊन काढण्यास दक्ष राहणार नाही ?