भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र

श्रावकसंघ 16

संघाची प्रतिष्ठा

बुध्दं सरणं गच्छामि ।
धम्मं सरणं गच्छामि ।
संघं सरणं गच्छामि ।

ह्याला शरणगमन म्हणतात.  आजला देखील बौद्ध जनता हें त्रिशरण म्हणत असते.  ही वहिवाट बुद्धाच्या हयातींतच सुरू झाली असावी.  आपल्या धर्माइतकेंच महत्त्व बुद्ध भगवंताने संघाला देऊन ठेवलें, हें लक्षांत ठेवण्याजोगें आहे.  कोणत्याही दुसर्‍या धर्मांत हा प्रकार नाही.  येशू ख्रिस्त म्हणतो, ''कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन.''*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  Matthew, 11, 28.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आणि कृष्ण भगवान म्हणतो,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥*

'सर्व धर्म सोडून तूं मला एकट्यालाच शरण जा; मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन.  तूं शोक करूं नकोस.'
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  भगवद्‍गीता, अ. १८, श्लो. ६६.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पण बुद्ध भगवान म्हणतो, ''तुम्ही बुद्ध धर्म आणि संघ यांचा आश्रय धरून स्वतःच्या परिश्रमाने आपल्या आणि इतरांच्या दुःखाचा नाश करा; जगाचें दुःख कमी करा.''

जगांतील सुज्ञ आणि शीलवान स्त्रीपुरुषांचा मोठा संघ बनवून त्याला जर आपण शरण गेलों, तर दुःखविनाशाचा मार्ग सुगम होणार नाही काय ?

संघच सर्वांचा पुढारी

बुद्ध भगवन्ताने आपल्या मागे संघाचा पुढारी नेमला नाही; सर्व संघाने मिळून संघकार्ये केलीं पाहिजेत, असा नियम घालून दिला.  एकसत्ताक राज्यपद्धतींत रुळलेल्या लोकांना ही बुद्धाची पद्धति चमत्कारिक वाटली, तर त्यांत नवल नाही.

भगवान् परिनिर्वाण पावून फार काळ झाला नव्हता.  त्या काळीं आनंद राजगृहांत राहत असे.  प्रद्योताच्या भयाने अजातशत्रु राजाने राजगृहाची डागडुजी चालविली; आणि त्या कामावर गोपक मोग्गल्लान ब्राह्मणाची नेमणूक केली.  आयुष्मान् आनंद राजगृहांत भिक्षेसाठी जाण्यास निघाला.  पण भिक्षाटनाला अद्यापि समय आहे असें वाटून तो गोपक मोग्गल्लान ब्राह्मणाच्या कामावर गेला.  ब्राह्मणाने त्याला आसन दिलें आणि स्वतः कमी दर्जाच्या आसनावर बसून प्रश्न विचारला, ''भगवन्तासारखा गुणी भिक्षु आहे काय ?''  आनंदाने ''नाही'' असें उत्तर दिलें.

ही गोष्ट चालली असतां मगध देशाचा प्रमुख मंत्री वस्सकार ब्राह्मण तेथे आला; आणि त्याने चाललेली गोष्ट ऐकून घेऊन आनंदाला प्रश्न केला, ''त्या भगवन्ताने अशा एखाद्या भिक्षूची निवड केली आहे काय, की भगवन्ताच्या अभावीं संघ त्या भिक्षूला शरण जाईल ?''  आनंदाने ''नाही'' असें उत्तर दिल्यावर वस्सकार ब्राह्मण म्हणाला, ''असा कोणी एखादा भिक्षु आहो का, की ज्याला संधाने भगवन्ताच्या स्थानीं निवडलें आहे ?''  आनंदाने ''नाही'' असें उत्तर दिलें.  वस्सकार म्हणाला, ''तेव्हा तुमच्या या भिक्षुसंघाला कोणताही नेता नाही.  असें असतां या संघांत सामग्री कशी राहते ?''  आनंद म्हणाला, ''आम्हांला नेता नाही असें समजूं नये.  भगवन्ताने विनयाचे नियम घालून दिले आहेत.  जेवढे भिक्षु एका गावांत राहतात, तेवढे एकत्र जमून त्या नियमांची आम्ही उजळणी करतों; ज्याच्याकडून दोष झाला असेल तो आपला दोष प्रगट करतो आणि त्याबद्दल प्रायश्चित्त घेतो........ एखादा भिक्षु शीलादिक गुणांनी संपन्न असला तर त्याचा आम्ही मान ठेवतों आणि त्याची सल्ला घेतों.''*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  मज्झिमनिकाय, गोपकमोग्गल्लानसुत्त (नं. १०८) पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वस्सकार ब्राह्मण अजातशत्रु राजाचा दिवाण होता.  कोणी तरी सर्वाधिकारी व्यक्ति असल्याशिवाय राज्यव्यवस्था सुरळीत चालणें शक्य नाही, असें त्याचें ठाम मत असलें पाहिजे.  बुद्धाने आपल्या गादीवर कोणाला बसविलें नाही, तरी निदान संघाने एखाद्या भिक्षूला निवडून त्या गादीवर त्याची स्थापना केली पाहिजे, असें वस्सकार ब्राह्मणाचें म्हणणें.  पण अशा सर्वाधिकार्‍यावाचून बुद्धाच्या पश्चात् देखील संघाचें काम सुरळीत चाललें; यावरून बुद्धाने केलेली संघाची रचना योग्य होती, असें म्हणावें लागतें.