भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


श्रावकसंघ 13

राहुल श्रामणेर

भिक्षुसंघ आणि भिक्षुणीसंघ स्थापन झाल्यावर त्यांत श्रामणेर आणि श्रामणेरी दाखल करून घ्याव्या लागल्या.  प्रथमतः बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेर करून घेतल्याची कथा महावग्गांत आली आहे, ती अशी :-

भगवान कांही काळ राजगृहांत राहून कपिलवस्तूला आला.  तेथे तो निग्रोधारामांत राहत असे.  एके दिवशीं भगवान् शुद्धोदनाच्या घराजवळून भिक्षाटन करीत असतां राहुलमातेने त्याला पाहिलें.  तेव्हा ती राहुलाला म्हणाली, ''बा राहुला, हा तुझा पिता आहे.  त्याच्याजवळ जाऊन आपला दायभाग माग.''  मातेचें वचन ऐकून राहुल भगवंतापुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, ''श्रमणा, तुझी सावली सुखकर आहे.''  भगवान तेथून चालता झाला.  राहुल त्याच्या मागोमाग, माझा दायभाग द्या, असें म्हणत गेला.  विहारांत गेल्यावर आपलें दायाद्य राहुलाला देण्याच्या उद्देशाने सारिपुत्ताला बोलावून भगवंताने राहुलाला श्रामणेर करविलें. ती गोष्ट शुद्धोदनाला आवडली नाही.  लहान मुलांना प्रव्रज्या दिली असतां त्यांच्या पालकांना दुःख कसें होतें. हें सांगून त्याने भगवंताला असा नियम करावयाला लावला की, अल्पवयी माणसाला प्रव्रज्या देऊं नये.

ही कथा ऐतिहासिक कसोटीला टिकत नाही.  एक तर शुद्धोदन शाक्य कपिलवस्तूमध्ये राहत नव्हता.  दुसरें, निग्रोधाराम बुद्धाच्या उतार वयांत बांधण्यांत आला आणि त्या वेळीं राहुल अल्पवयी नव्हता.  तेव्हा, ही गोष्ट पुष्कळ शतकांनंतर रचून महावग्गांत दाखल केली आहे, असें म्हणावें लागतें.

बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेरदीक्षा दिली, त्या वेळीं त्याचें वय सात वर्षांचें होतें, असें अम्बलट्ठिकराहुलोवाद सुत्ताच्या अट्ठकथेंत म्हटलें आहे आणि हीच समजूत बौद्ध लोकांत अद्यापिही प्रचलित आहे.  बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाच्या दिवशीं राहुल कुमार जन्मला, असें गृहीत धरलें, तर तो श्रमणेरदीक्षेच्या वेळीं सात वर्षांचा होता हें संभवत नाही.  कां की गृहत्यागानंतर बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध झाल्यावर पहिला चातुर्मास वाराणसीला घालविला; आणि त्यानं संघस्थापनेला एक वर्ष तरी लागलें असलें पाहिजे.  तेव्हा राहुल कुमार श्रमणेरदीक्षेच्या वेळीं सात वर्षांचा राहणें शक्यच नव्हतें.

राहुलाला श्रामणेर कशा प्रकारें करण्यांत आलें, ह्याचें अनुमान सुत्तनिपातांतील राहुलसुत्तावरून करतां येण्याजोगें आहे, म्हणून त्या सुत्ताचें भाषांतर येथे देतों.

(भगवान-) (१) सतत परिचयाने तूं पंडिताची अवज्ञा करीत नाहीस ना ?  मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणार्‍याची (त्याची) तूं योग्य सेवा करतोस काय ?

(राहुल-) (२) मी सतत परिचयामुळे पंडिताची अवज्ञा करीत नाही.  मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणार्‍याची मी सदोदित योग्य सेवा करतों.

(ह्या प्रास्तविक गाथा होत.)

(भगवान-) (३) प्रिय वाटणारे मनोरम (पंचेन्द्रियांचे) पांच कामोपभोग सोडून श्रद्धापूर्वक घरांतून बाहेर नीघ आणि दुःखाचा उन्त करणारा हो.

(४) कल्याण मित्रांची संगति धर.  जेथे फारशी गडबड नाही, अशा एकांत स्थळीं तुझें वसतिस्थान असूं दे; आणि मिताहारी हो.

(५) चीवर (वस्त्र), पिण्डपात (अन्न), औषधि पदार्थ आणि राहण्याची जागा, यांची तृष्णा धरूं नकोस आणि पुनर्जन्म घेऊं नकोस.

(६) विनयाच्या नियमांत आणि पंचेन्द्रियांत संयम ठेव; कायगता स्मृति असूं दे; आणि वैराग्यपूर्ण हो.

(७) कामविकाराने मिश्रित असें विषयांचें शुभ निमित्त सोडून दे व एकाग्रता आणि समाधि प्राप्‍त करून देणार्‍या अशुभ निमित्ताची भावना* कर.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  अशुभ भावनेसंबंधी 'समाधिमार्ग', पृ. ४९-५८ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(८) आणि अनिमित्ताची (निर्वाणाची) भावना कर व अहंकार सोड.  अहंकाराचा नाश केल्यावर तूं शांतपणें राहशील.

याप्रमाणे भगवान ह्या गाथांनी राहुलला पुनः पुनः उपदेश करता झाला.