भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


श्रावकसंघ 11

एके वेळीं भगवान कौशाम्बी येथे घोषितारामांत राहत होता.  तेव्हा आयुष्मान् आनंद त्याजपाशीं येऊन नमस्कार करून एका बाजूला बसला.  त्याला भगवान म्हणाला, ''आनंदा, तो खटला मिटला की नाही ?''

आ. - भदन्त, खटला मिटणार कसा ?  अनुरुद्धाचा शिष्य बाहिय जणू काय संघभेद करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे; आणि अनुरुद्ध त्याला एक शब्द देखील बोलत नाही.

भ. - पण, आनन्दा, अनुरुद्ध संघांतील भांडणें तोडण्याच्या कामीं कधी हात घालीत असतो ?  तूं आणि सारिपुत्त- मोग्गल्लान हीं भांडणें मिटवीत नसतां काय ?

यावरून असें दिसून येईल की, बहियामुळे हें भांडण उपस्थित होऊन विकोपाला गेलें आणि तें मिटविण्याच्या कामीं खुद्द भगवन्ताला प्रयत्‍न करावा लागला.  त्या भिक्षूंच्या सभेंतून भगवान् कांही काळ दुसरीकडे गेला असला, तरी तें भांडण कौशाम्बी येथेच मिटलें असावें.

अशा प्रसंगीं भांडखोर भिक्षूंना ताळ्यावर आणण्यासाठी उपासकांनी त्यांच्यावर बहिष्कार घालावा आणि ते शुद्धीवर आले म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने तें भांडण मिटवावें, हें दाखविण्याच्या उद्देशाने महावग्गाच्या कत्याने ही गोष्ट रचली आहे, असें सिद्ध होतें.  असल्या लहानसहान भांडणाचा संघावर विपरीत परिणाम होणें मुळीच शक्य नव्हतें.

भिक्षुणीसंघाची स्थापना

भिक्षुणीसंघाच्या स्थापनेची हकीगत चुल्लवग्गांत आली आहे.  तिचा सारांश असा :-

बुद्ध भगवान कपिलवस्तु येथे निग्रोधारामांत राहत होता.  तेव्हा महाप्रजापती गोतमी भगवंताजवळ येऊन म्हणाली, ''भदन्त, बायकांना आपल्या संप्रदायांत प्रव्रज्या घेण्यास पारवानगी द्या.''  भगवंताने ती विनंती तीनदा नाकारली आणि भगवान तेथून वैशाली येथे आला.  महाप्रजापती गोतमी आपलें केशवपन करून आणि बर्‍याच शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन भगवन्ताच्या मागोमाग वैशालीला आली.  प्रवासाने तिचे पाय सुजले होते, अंग धुळीने माखलें होतें आणि चेहर्‍यावर उदासीनता पसरली होती.  आनंदाने तिला पाहून तिच्या उदासीनतेचें कारण विचारलें.  ''स्त्रियांना बौद्ध संप्रदायांत प्रव्रज्या घेण्यास भगवान परवानगी देत नाही, म्हणून मी उदासीन झालें,'' असें गोतमी म्हणाली.  तिला तेथेच राहण्यास सांगून आनंद भगवंतापाशीं गेला आणि, स्त्रियांस प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्यावी, अशी त्याने भगवन्ताला विनंती केली.  भगवन्ताने ती गोष्ट नाकारली, तेव्हा आनंद म्हणाला, ''भदन्त, तथागताने निवेदिलेल्या धर्मसंप्रदायांत भिक्षुणी होऊन एखाद्या स्त्रियेला स्त्रोतआपत्तिफल, सकृदागामिफल, अनागामिफल आणि अर्हत्फल*  प्राप्‍त करून घेणें शक्य आहे की नाही ?''  भगवन्ताने 'शक्य आहे,' असें उत्तर दिल्यावर आनंद म्हणाला, ''असें जर आहे, तर ज्या मावशीने भगवन्ताला आईच्या अभावीं दूध पाजून लहानाचें मोठें केलें तिच्या विनंतीवरून भगवन्ताने स्त्रियांना प्रव्रज्या द्यावी.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  या चार फलांचें स्पष्टीकरण पुढे याच प्रकरणांत आलें आहे.  पृ. १७८ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भगवान म्हणाला, ''जर महाप्रजापती गोतमी आठ जबाबदारीचे नियम (अट्ठ गरुधम्मा) पत्करील तर स्त्रियांना प्रव्रज्या घेण्यास मी परवानगी देतों.  (१) भिक्षुणी संघांत कितीही वर्षे राहिलेली असो, तिने लहान मोठ्या सर्व भिक्षूंना नमस्कार केला पाहिजे.  (२) ज्या गावीं भिक्षु नसतील त्या गावीं भिक्षुणीने राहतां कामा नये.  (३) दर पंधरवड्यास उपासथ कोणत्या दिवशीं व धर्मोपदेश ऐकण्यास कधी यावें, या दोन गोष्टी भिक्षुणीने भिक्षुसंघाला विचाराव्या.  (४) चातुर्मासानंतर भिक्षुणीने भिक्षुसंघाची व भिक्षुणीसंघाची प्रवारणा* केली पाहिजे.  (५) ज्या भिक्षुणीकडून संघादिशेष आपत्ति घडली असेल, तिने दोन्ही संघांकडून पंधरा दिवसांचें मानत्त २ घेतलें पाहिजे.  (६) दोन वर्षे अभ्यास केला असेल अशा श्रामणेरीला दोन्ही संघांनी उपसंपदा दिली पाहिजे.  (७) कोणत्याही कारणास्तव भिक्षुणीने भिक्षूला शिवीगाळ करतां कामा नये.  (८) भिक्षुणीने भिक्षूला उपदेश करतां कामा नये; भिक्षूने भिक्षुणीला उपदेश करावा.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  स्वदोष सांगण्याविषयीं संघाला विनंती करणें.  'बौद्धसंघाचा परिचय', पृ. २४-२६ पाहा.
**  संघाचा संतोष होण्यासाठी विहाराबाहेर रात्री काढणें.  'बौद्धसंघाचा परिचय', पृ. ४७ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------