भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


श्रावकसंघ 7

संघाचे कांही नियम लोकरूढीवरून ठरविले

परंतु राज्यानुशासनाचे सर्वच नियम संघाला लागू करतां येणें शक्य नव्हतें.  संघांत एखाद्या भिक्षूने कांही अपराध केला तरी त्याला जास्तींत जास्त दंड म्हटला म्हणजे संघांतून हाकून देणें हा होता; याच्या पलीकडे दुसरा कठोर दंड नव्हता.  कां की, संघाचे सर्व नियम अहिंसात्मक होते.  त्यांपैकी बरेचसे नियम केवळ चालू असलेल्या लोकरूढीवरून घेतले होते.  उदाहरणार्थ, खालील नियम घ्या -

बुद्ध भगवान आळवी येथे अग्गाळव चेतियांत राहत होता.  त्या काळीं आळवक भिक्षु बांधकाम करीत असतां जमीन खोदवीत.  त्यांच्यावर लोक टीका करूं लागले.  ही गोष्ट समजली, तेव्हा भगवंताने त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा :-

जो भिक्षु जमीन खणील किंवा खणवील, त्याला पाचित्तिय होतें.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  'बौद्धसंघाचा परिचय', पृ. ९७ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिक्षूंनी लहानशी कुटी किंवा बेताचा विहार बांधून त्यांत राहावें, एवढी परवानगी भगवंताने दिली होती; आणि त्या कामीं जमीन स्वतः खोदणें किंवा दुसर्‍यास खोदावयास लावणें पाप आहे, असें नव्हतें.  तथापि हा नियम केवळ लोकांच्या समाधानार्थ करावा लागला.  बहुतेक श्रमण लहान सहान जंतूंचा नाश होऊं नये म्हणून खबरदारी घेत.  ते रात्रीचा दिवा देखील पेटवीत नसत.  कां की, त्या दिव्यावर पतंग वगैरे प्राणीं येऊन पडण्याचा संभव होता.  आणि त्यांचे हे आचार लोकांच्या आंगवळणीं पडले होते.  एखादा श्रमण स्वतः कुदळ घेऊन जमीन खोदावयास लागला, तर सामान्य जनांच्या मनाला धक्का बसणें अगदी साहजिक होतें.  त्यांच्याशीं वादविवाद करून त्यांचा दृष्टिकोण बदलण्याची बुद्ध भगवंताला जरूर भासली नाही. तपश्चर्येत वृथा काल न घालवितां भिक्षूंना जनतेचा धर्मोपदेश करण्यास आणि ध्यानसमाधीच्या योगें स्वचित्ताचें दमन करण्यास अवकाश मिळावा म्हणजे संघाचा कार्यभाग सुलभ होईल हें बुद्ध भगवान जाणून होता; आणि म्हणून ज्या रीतीभाती निरुपद्रवी होत्या, त्या संघाला लागू करण्यास भगवंताला हरकत वाटली नाही.

भिक्षुसंघाचा साधेपणा


भगवंताला इतर संघांत चालू असलेली तपश्चर्या मुळीच पसंत नव्हती, तथापि आपल्या संघांतील भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावें याबद्दल भगवान फार काळजी घेत असे.  भिक्षु जर परिग्रही बनले तर ते आपल्या परिग्रहासह चारी दिशांना जाऊन प्रचारकार्य कसें करूं शकतील ?  सामञ्ञफलसुत्तांत भगवान बुद्ध अजातशत्रु राजाला म्हणतो,

सेय्यथापि महाराज पक्खी सकुणो येन येनेव डेति सपत्तभारो व डेति ।  एवमेव महाराज भिक्खु संतुट्टो होती, कायपरिहारिकेन चीवरेन, कुच्छिपरिहारिकेन पिण्डपातेन ।  सो येन येनेव पक्कमति समादायेव पक्कमति ।

'हे महाराज, जसा एखादा पक्षी ज्या दिशेला उडतो त्या त्या दिशेला आपल्या पंखांसहच उडतो, त्याचप्रमाणे, हे महाराज, भिक्षु शरीराला लागणार्‍या चीवराने आणि पोटाला लागणार्‍या पिंडाने (भिक्षेने) संतुष्ट होतो.  तो ज्या ज्या दिशेला जातो, त्या त्या दिशेला आपलें सामान बरोबर घेऊनच जातो.'

अशा भिक्षूजवळ फार झालें तर खालील गाथेंत दिलेल्या आठ वस्तु असत.

तिचीवरं च पत्तो च वासि सूचि च बन्धनं ।
परिस्सावनेन अट्ठेते युत्तयोगस्स भिक्खुनो ॥

'तीन चीवरें, पात्र, वासि (लहानशी कुर्‍हाड), सुई, कमरबंध व पाणी गाळण्याचें फडकें, या आठ वस्तु योगी भिक्षूला पुरे आहेत.'