भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


तपश्चर्या व तत्वबोध 14

चार आर्यसत्त्यांचे स्पष्टीकरण

जगांत दुःख आहे हें कोणालाही नाकबूल करतां येत नाही.  परंतु जो तो आपलें दुःख कसें नष्ट होईल याच विचारांत असतो.  त्याचा परिणाम असा होतो की, दुसर्‍याचा घातपात करून देखील प्रत्येक जण आपण सुखी होऊं इच्छितो.  त्यांत जे हिंसक असून बुद्धिमान् असतात, ते पुढारी बनतात, व इतरांना त्यांचें ताबेदार व्हावें लागतें.  हिंसक बुद्धीमुळे ह्या पुढार्‍यांना देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळ्यांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान् पुढार्‍याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणें भाग पडतें.  राजाला आपलें राज्य दुसरा राजा घेईल असें भय वाटतें आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो.  अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागीं दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपलें आणि इतरांचें दुःख एक आहे अशी जाणीव झाली पाहिजे; आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दुःखाचा समावेश केला.

जन्मजरामरणादिक सर्वसाधारण दुःख श्रमणांना मान्य होतें, इतकेंच नव्हे, तर त्या दुःखाचा नाश करण्यासाठीच त्यांची तपश्चर्या असे.  परंतु दुःखाचें कारण कोणतें, यासंबंधी त्यांचा मतभेद होता.  कोणी म्हणत, दुःख आत्म्याने उत्पन्न केलें (सयंकतं दुक्खं); दुसरे म्हणत, दुःख पराने उत्पन्न केलें (परंकतं दुक्खं); तिसरे म्हणत, कांही अंशी आत्म्याने आणि कांही अंशीं पराने दुःख उत्पन्न केलें (सयंकतं च परंकतं च दुक्खं); आणि चवथे म्हणत, दुःख आत्म्याने किंवा पराने उत्पन्न केलें नसून आकस्मित आहे (असयंकारं अपरंकारं अधिच्चसमुप्पन्नं दुक्खं).*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  निदानवग्गसंयुत्त, वर्ग २, सुत्त ७ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यांत पहिल्या प्रकारचे श्रमण म्हटले म्हणजे निर्ग्रन्थ (जैन) वगैरे होत.  पूर्वजन्मीं आत्म्याने पाप केल्यामुळे दुःख उत्पन्न झालें, असें ते समजत आणि त्याच्या परिहारार्थ देहदण्डन करून आत्म्याला कष्टवीत.  दुसर्‍या प्रकारचे श्रमण सांख्यांसारखे होते.  ते जड प्रकृतीमुळे दुःख उत्पन्न झालें असें मानीत आणि आत्म्याला प्रकृतीच्या तडाक्यांतून सोडविण्यासाठी खडतर तप करीत.  तिसर्‍या प्रकारचे श्रमण आत्मा आणि प्रकृति मिळून दुःख उत्पन्न करतात असें प्रतिपादीत आणि आत्म्याला त्यांतून सोडविण्यासाठी देहण्डन करीत.  चवथ्या प्रकारचे श्रमण दुःख आकस्मित समजत असल्यामुळे अक्रियवादाकडे झुकत.  अशा रीतीने श्रमण एक तर निष्फल तपश्चर्या करीत, किंवा निष्क्रिय बनत.  बहुजनसमाजाला त्यांचा फारच थोडा उपयोग होई.

दुःखाचें खरें कारण आत्मा किंवा प्रकृति नूसन मनुष्याची तृष्णा आहे, हें प्रथमतः बुद्ध भगवन्ताने दाखवून दिलें.  पूर्वजन्मींच्या आणि ह्या जन्मींच्या तृष्णेमुळेच सर्व दुःख उत्पन्न होतें.  तृष्णा कोठून आली, हा प्रश्न निरर्थक आहे.  ती जोंपर्यंत असेल तोंपर्यंत दुःख उत्पन्न होणारच.  हें दुसरें आर्यसत्य.

तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखांतून मुक्त होतो, हें तिसरें आर्यसत्य.

आणि तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या मधून जाणारा आर्य अष्टांगिक मार्ग, हें चवथें आर्यसत्य.