भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


तपश्चर्या व तत्वबोध 11

तत्त्वबोध

त्या वैशाखी पूर्णिमेच्या रात्रीं बोधिसत्त्वाला तत्त्वबोध झाला; आणि तेव्हापासून त्याला बुद्ध म्हणतात.  म्हणजे तोंपर्यंत गोतम बोधिसत्त्व होता, तो त्या दिवसापासून गोतम बुद्ध झाला.  बुद्धाला झालेला तत्त्वबोध म्हटला म्हणजे चार आर्यसत्यें व तदन्तर्गत अष्टांगिक मार्ग होय.  त्याचा उपदेश त्याने प्रथमतः आपल्या बरोबर राहणार्‍या पांच साथ्यांना केला.  (तो प्रसंग पुढे येणार असल्यामुळे तेथे त्याचें विवरण करीत नाही.)

विमुत्तिसुखाचा आस्वाद

तत्त्वबोध झाल्यावर बुद्ध भगवान त्याच बोधिवृक्षाखाली सात दिवस बसून विमुत्तिसुखाचा आस्वाद घेत होता; आणि त्याप्रसंगी रात्रींच्या तीन यामांत त्याने खाली दिलेला प्रतीत्यसमुत्पाद सुलटउलट मनांत आणला, असें महावग्गांत म्हटलें आहे.  परंतु संयुत्तनिकायांतील दोन सुत्तांत बुद्धाने बोधिसत्त्वावस्थेंत असतांनाच हा प्रतीत्यसमुत्पाद जाणला असें सांगितलें आहे.*  त्या सुत्तांचा व महावग्गांतील मजकुराचा मेळ बसत नाही.  महावग्ग लिहिला त्या वेळीं या प्रतीत्यसमुत्पादाला भलतेंच महत्त्व आलें होतें असें वाटतें.  नागार्जुनासारख्या महायानपंथाच्या आचार्यांनी तर या प्रतीत्यसमुत्पादाला आपल्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत पाया बनविलें.**
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  निदानवग्गसंयुक्त, सुत्त १० व ६५ पहा.
**  माध्यमककारिकेचा आरंभ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतीत्यसमुत्पाद

तो प्रतीत्यसमुत्पाद संक्षेपतः येणेंप्रमाणे -

अविद्येपासून संस्कार, संस्कारांपासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म), आणि जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दुःख, दौर्मनस्य, उपायास हे उत्पन्न होतात.

पूर्ण वैराग्याने अविद्येचा निरोध केला असतां संस्कारांचा निरोध होतो.  संस्कारांच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो.  विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो.  नामरूपाच्या निरोधाने षडायतनाचा निरोध, षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध, स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध, वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध, तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध, उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध, भवाच्या निरोधाने जन्माचा निरोध, जन्माच्या निरोधाने जरा, मरण, शोक परिदेवन, दुःख, दौर्मनस्य, उपायास, यांचा निरोध होतो.

दुःखाच्या मागे एवढी कारणपरंपरा जोडल्याने तें सामान्य जनतेला समजणें बरेंच कठीण झालें.  होतां होतां या प्रतीत्यसमुत्पादाला गहन तत्त्वज्ञानाचें स्वरूप आलें, आणि त्याच्यावरच वादविवाद होऊं लागले.  नागार्जुनाचार्याने आपली माध्यमककारिका या प्रतीत्यसमुत्पादाच्या पायावरच लिहिली आहे; आणि बुद्धघोषाचार्याने विशुद्धिमार्गाचा एकषष्ठांश भाग (जवळ जवळ शें सवाशें पृष्ठें) याच्या विवेचनांत खर्च केला आहे.  ही सगळी चर्चा वाचल्यावर विद्वान मनुष्य देखील घोटाळ्यांत पडतो, मग सामान्य जनतेला हें तत्त्वज्ञान समजावें कसें ?  बुद्ध भगवन्ताचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे उच्च वर्णाच्या लोकांपेक्षा खालच्या वर्गाच्या लोकांत विशेष फैलावला, तो अशा गहन तत्त्वज्ञानामुळे नव्हे.  चार आर्यसत्यांचें तत्त्वज्ञान अगदी साधें आहे.  तें सर्व प्रकारच्या लोकांना पटलें, यांत मुळीच नवल नाही.  त्याचा विचार लौकरच करण्यांत येईल.