भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


तपश्चर्या व तत्वबोध 3

या सुत्ताच्या तिसर्‍या गाथेंत बोधिसत्त्वाने काया, वाचा व उपजीविका यांचें संशोधन केल्याचा उल्लेख आला आहे.  हें कृत्य घरांतून निघाल्यानंतर वाटेंतल्या वाटेंत त्याला करतां येणें शक्य दिसत नाही.  आळार कालाम व उद्दक रामपुत्त यांपाशीं राहून त्यांचे आचार विचार नीट सांभाळून बोधिसत्त्वाने हें काम केलें असावें असें दिसतें.  पण एवढ्याने त्याचें समाधान न होतां प्रसिद्ध श्रमणनायकांचें तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने तो राजगृहाला आला. तेथे त्या सर्व संप्रदायांमध्ये कमीजास्ती प्रमाणाने तपश्चर्या आढळून आल्यामुळे आपणही अशीच तपश्चर्या केली पाहिजे, असें त्याला वाटलें, आणि म्हणूनच या सुत्ताच्या शेवटल्या गाथेंत, 'आता मी तपश्चर्येसाठी जात आहें,' असें तो म्हणतो.  कामोपभोगांतून त्याचें मन पूर्वीच निघालें असल्यामुळे मगधराजाने देऊं केलेला अधिकार त्याला आवडला नाही, हें सांगावयालाच नको.

उरुवेलेला आगमन

राजगृहाहून बोधिसत्त्व उरुवेलेला आला आणि तपश्चर्या करण्यासाठी हें स्थान त्याने पसंत केलें.  त्याचें वर्णन अरियपरियेसन सुत्तांत सापडतें.

भगवान् म्हणतो, ''भिक्षुहो, तो मी कुशल कोणतें हें जाणण्याच्या हेतूने लोकोत्तर शांतीच्या श्रेष्ठ स्थानाचा शोध करीत करीत क्रमशः प्रवास करून उरुवेला येथे सेनानिगमाला आलों.  तेथे मी रमणीय भुमिभाग पाहिला.  त्यांत सुशोभित वन असून नदी मंद मंद वाहत होती.  तिच्या दोन्ही बाजूंला सफेत वाळवंट व उतार सोपा, आणि ती अत्यंत रमणीय.  या वनाच्या चारी बाजूंना भिक्षाटन करण्यासाठी गाव दिसले.  हा रमणीय भूमिभाग असल्यामुळे कुलीन मनुष्याला तपश्चर्या करण्याचा योग्य वाटून मी त्याच ठिकाणीं तपश्चर्या चालविली.''

राजगृहाच्या सभोवतीं ज्या टेकड्या आहेत त्यांच्यावर निर्ग्रंथ वगैरे श्रमण तपश्चर्या करीत असत,  असा उल्लेख बर्‍याच ठिकाणीं सापडतो.  पण बोधिसत्त्वाला तपश्चर्येसाठी हे रुक्ष पर्वत आवडले नाहीत; उरुवेलेचा रम्य प्रदेश आवडला.  यावरून सृष्टिसौंदर्यावर असलेलें त्याचें प्रेम व्यक्त होतें.

तीन उपमा

तपश्चर्येला आरंभ करण्यापूर्वी बोधिसत्त्वाला तीन उपमा सुचल्या.  त्यांचें वर्णन महासच्चकसुत्तांत केलें आहे.  भगवान् म्हणतो, ''हे अग्गिवेस्सना, एखादें ओलें लाकूड पाण्यांत पडलेलें असलें, आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घेऊन त्याच्यावर घासून अग्नि उत्पन्न करूं लागला, तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय ?''

सच्चक- भो गोतम, त्या लाकडांतून आग उत्पन्न होणे शक्य नाही.  कां की, तें ओलें आहे.  त्या माणसाचें परिश्रम व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल.

भगवान्-त्याचप्रमाणें, हे अग्गिवेस्सना, जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण शरीराने आणि मनाने कामोपभोगांपासून अलिप्‍त झाले नाहीत आणि ज्यांचा कामविकार शांत झाला नाही त्यांनी कितीही कष्ट भोगले तरी त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्‍त व्हावयाचा नाही.  हे अग्गिवेस्सना, दुसरी मला उपमा अशी सुचली की, एखादें ओलें लाकूड पाण्याहून दूर पडलें आहे आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घासून त्यांतून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न करूं लागला, तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय ?

सच्चक- नाही, भो गोतम, त्याचा प्रयत्‍न व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल. कां की, हें लाकूड ओलें आहे.