भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


तपश्चर्या व तत्वबोध 2

बिंबिसार राजाची भेट

राजगृहांत बोधिसत्त्वाच्या आगमनाचें वर्णन एका अज्ञात कवीने सुत्तनिपातांतील पब्बज्जासुत्तांत केलें आहे.  त्याचें भाषान्तर येणेंप्रमाणें :-

१.  चक्षुष्मत्ताने (बोधिसत्त्वाने) प्रव्रज्या कां घेतली व कोणत्या विचारामुळे त्याला ती आवडली हें सांगून (त्याच्या) प्रव्रज्येचें मी वर्णन करतों.

२.  गृहस्थाश्रम ही अडचणीची आणि कचर्‍याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा असें जाणून त्याने प्रव्रज्या घेतली.

३.  प्रव्रज्या घेऊन त्याने शारीरिक पापकर्म वर्ज्य केलें.  वाचसिक दुर्वर्तन सोडून दिलें आणि आपली उपजीविका शुद्ध मार्गाने चालविली.

४.  बुद्ध मगधांच्या गिरिव्रजाला (राजगृहाला) आला.  सर्व शरीरावर उत्तम लक्षणें फैलावलीं आहेत अशा त्याने राजगृहांत भिक्षाटनासाठी प्रवेश केला.

५.  आपल्या प्रासादावरून बिंबिसाराने त्याला पाहिलें.  त्याची लक्षणसंपत्ति पाहून बिंबिसार म्हणाला,

६.  अहो माझें ऐका ः-  हा सुंदर, भव्य, शुद्ध आणि आचरणाने संपन्न असून पायापाशीं दोन हातांच्या अंतरावर दृष्टि ठेवून चालतो. (युगमत्तं च पेक्खति).

७.  हा दृष्टि पायापाशीं ठेवून चालणारा जागृत भिक्षु नीच कुळांतला वाटत नाही.  तो कोठे जात आहे, हें राजदूतांना धावत जाऊन पाहूं द्या.

८.  तो भिक्षु (बोधिसत्त्व) कोठे जातो व वस्तीला कोठे राहतो हें पाहण्यासाठी ते (बिंबिसार राजाने पाठविलेले) दूत त्याच्या मागोमाग गेले.

९. इन्द्रियांचें संरक्षण करीत घरोघरीं भिक्षा घेऊन विवेकी आणि जागृत बोधिसत्त्वाने ताबडतोब पात्रभर भिक्षा मिळविली.

१०.  भिक्षाटन पुरें करून तो मुनि नगरांतून बाहेर पडला आणि वस्तीला येथे राहीन अशा उद्देशाने पाण्डव पर्वताजवळ आला.

११.  त्याला वस्तीला राहिलेला पाहून ते दूत त्याच्याजवळ बसले आणि त्यांपैकी एकाने जाऊन राजाला खबर दिली,-

१२.  'महाराज, तो भिक्षु पाण्डव पर्वताच्या पूर्वेला व्याघ्रासारखा, ॠषभासारखा किंवा गिरिगव्हरांत राहणार्‍या सिंहासारखा बसला आहे !'

१३.  तें दूताचें वचन ऐकून तो क्षत्रिय (राजा) उत्तम यानांत बसला व त्वरेने पाण्डव पर्वताकडे जाण्यास निघाला.

१४.  जिथपर्यंत यानाने जाणें शक्य होतें तिथपर्यंत जाऊन तो क्षत्रिय यानांतून खाली उतरला आणि पायींच (बोधिसत्त्वाच्या) जवळ येऊन त्याच्या संनिध बसला.

१५.  तेथे बसून राजाने त्याला कुशलप्रश्नादिक विचारले.  कुशलप्रश्नादिक विचारून तो येणेंप्रमाणें बोलला :-

१६.  तूं जवान आणि तरुण आहेस; मनुष्याच्या प्रथम वयांतला आहेत.  तुझी कान्ति कुलीन क्षत्रियासारखी अत्यंत रोचक दिसते.

१७.  तूं हत्तींचा समुदाय बरोबर घेऊन माझ्या सेनेला शोभा आण.  मी तुला संपत्ति देतों, तिचा उपभोग घे; आणि आता तुझी जाति कोणती, हें मला सांग.

१८.  हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशीं धनाने आणि वीर्याने संपन्न-ज्याचा कोसल राष्ट्रांत समावेश होतो-असा देश आहे.

१९.  त्यांचें (तेथल्या महाजनांचें) गोत्र आदित्य आहे आणि त्यांच्या जातीला शाक्य म्हणतात.  त्या कुलांतून, हे राजा, मी परिव्राजक झालों, तो कोमोपभोगांच्या इच्छेने नव्हे.

२०.  कामोपभोगांत मला दोष दिसला आणि एकान्तवास सुखाचा वाटला.  आता मी तपश्चर्येसाठी जात आहें.  त्या मार्गांत माझें मन रमतें.