भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


गोतम बोधिसत्त्व 13

या म्हणण्याला आधार मज्झिमनिकायांतील महासच्चक सुत्तांतही सापडतो.  तेथे भगवान् म्हणतो, ''हे अग्गिश्वेस्सन, संबोधिज्ञान होण्यापूर्वी, बोधिसत्त्व असतांनाच मला वाटलें, 'गृहस्थाश्रम अडचणीची व कचर्‍याची जागा आहे.  प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा.  गृहस्थाश्रमांत राहून अत्यंत परिपूर्ण आणि परिशुद्ध ब्रह्मचर्य आचरणें शक्य नाही.  म्हणून मुंडण करून आणि काषाय वस्त्रें धारण करून घरांतून बाहेर पडून परिव्राजक होणें योग्य आहे.' ''

परंतु अरियपरियेसनसुत्तांत याच्यापेक्षा थाडेसें भिन्न कारण दिलें आहे.  भगवान् म्हणतो, ''भिक्षुहो, संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्व असतांनाच मी स्वतः जन्मधर्मी असतांना, जन्माच्या फेर्‍यांत सापडलेल्या वस्तूंच्या (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलों होतों.  (म्हणजे माझें सुख त्यांजवर अवलंबून आहे असें मला वाटे.)  स्वतः जराधर्मी असतांना, व्याधिधर्मी असतांना, मरणधर्मी असतांना, शोकधर्मी असतांना, जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फेर्‍यांत सापडलेल्या वस्तूंच्याच मागे लागलों होतों.  तेव्हा माझ्या मनांत असा विचार आला की, मी स्वतः जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असतां त्यांनीच संबद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागे लागलों आहें, हें ठीक नव्हे; तर मग मी या जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असें जें परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हें योग्य आहे.''

याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या प्रव्रज्येला साधारणपणें तीन कारणें दिलीं आहेत. (१) आपल्या आप्तांनी परस्परांशीं लढण्यासाठी शस्त्र धारण केल्यामुळे त्याला भय वाटलें; (२) घर अडचणीची व कचर्‍याची जागा आहे असें वाटलें; आणि (३) आपण जन्म, जरा, मरण, व्याधि यांनी संबद्ध असतां अशाच प्रकारच्या वस्तूंवर आसक्त होऊन राहातां कामा नये असें वाटलें.  या तीन्ही कारणांची संगति लावतां येणें शक्य आहे.

बोधिसत्त्वाचे जातभाई शाक्य व कोलिय यांच्यामध्ये तंटे बखेडे उत्पन्न झाले, आणि त्या प्रसंगीं त्यांत आपण शिरावें की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला.  मारामारीने हे खटले मिटणार नाहीत हें त्याने जाणलें.  पण त्यांत जर आपण शिरलों नाही तर लोक आपणाला भित्रा म्हणतील व गृहस्थाचा धर्म पाळला नाही असें होईल.  अर्थात् गृहस्थाश्रम त्याला अडचणीची जागा भासूं लागली.  त्यापेक्षा संन्यासी होऊन निरपेक्षपणें रानावनांत हिंडत राहणें काय वाईट होतें ?  परंतु त्याचें आपल्या पत्‍नीवर आणि मुलावर प्रेम असल्यामुळे गृहत्याग करणें फार कठीण होतें.  तेव्हा त्याला आणखीही विचार करावा लागला.  मी स्वतः जाति-जरा-व्याधि-मरणधर्मी असतां अशाच स्वभावाने बद्ध झालेले जे पुत्रदारादिक त्यांच्यावर आसक्त होऊन ह्या अडचणीच्या आणि कचर्‍याच्या गृहस्थाश्रमांत पडून राहणें योग्य नाही असें त्याला वाटलें; आणि म्हणून तो परिव्राजक झाला.  या तीन्ही कारणांत मुख्य कारण म्हटलें म्हणजे शाक्यांच्या आणि कोलियांच्या मारामार्‍या होत, हें लक्षांत ठेवलें असतां बोधिसत्त्वाने पुढे बुद्ध होऊन शोधून काढलेल्या मध्यम वर्गाचा अर्थ बरोबर समजेल.

राहुल कुमार

बोधिसत्त्वाचें लग्न तरुणपणीं होऊन गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नांवाचा मुलगा झाला, याला त्रिपिटकांत अनेक ठिकाणीं आधार सापडतात.  जातकाच्या निदानकथेंत राहुल कुमार ज्या दिवशीं जन्मला त्याच रात्रीं बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, असें म्हटलें आहे.  पण दुसर्‍या अट्ठकथाकारांचें म्हणणें असें दिसतें की, राहुल कुमार जन्मल्यानंतर सातव्या दिवशीं बोधिसत्त्वाने गृहत्याग केला.  या दोन्ही विधानांना आधार प्राचीन वाङ्‌मयांत सापडत नाही.  एवढें खास की, बोधिसत्त्वाने गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नांवाचा एक मुलगा होता.  गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन कपिलवस्तूला आला, आणि त्याप्रसंगीं त्याने राहुलला दीक्षा दिली, अशी वर्णनें महावग्गांत व इतर ठिकाणीं सापडतात.  त्या वेळीं राहुल सात वर्षांचा होता, असें अट्ठकथांत अनेक ठिकाणीं म्हटलें आहे.  राहुलाला भगवंताने श्रामणेर केलें की काय आणि तो त्या वेळीं किती वर्षांचा असावा याचा विचार सहाव्या प्रकरणांत करण्यांत येईल.  कां की, श्रामणेराचा संबंध भिक्षुसंघाशीं येतो.