भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


गोतम बोधिसत्त्व 4

महानामाने ही गोष्ट कबूल केली व धाकट्या भावाला तो प्रपंचाची माहिती करून देऊं लागला.  तो म्हणाला, ''प्रथमतः शेत नांगरलें पाहिजे.  नंतर पेरणी केली पाहिजे.  त्यानंतर त्याला कालव्याचें पाणी द्यावें लागलें.  पाणी बाहेर काढून त्याची खुरपणी करतात.  आणि तें पिकलें म्हणजे कापणी करावी लागते.''

अनुरुद्ध म्हणाला, ''ही खटपट फारच मोठी दिसते.  घरचा व्यवहार तुम्हीच सांभाळा.  मी भिक्षु होतों.''  पण या कामीं त्याला आपल्या आईची संमति मिळेना.  आणि तो तर हट्ट धरून बसला, तेव्हा ती म्हणाली, ''शाक्यांचा राजा भद्दिय जर तुझ्याबरोबर भिक्षु होत असेल, तर मी तुला भिक्षु होण्यास परवानगी देतें.''

भद्दिय राजा अनुरुद्धाचा मित्र होता.  पण तो राज्यपद सोडून भिक्षु होणार नाही, असें अनुरुद्धाच्या आईला वाटलें, आणि म्हणूनच तिने ही अट घातली.  अनुरुद्ध आपल्या मित्राजवळ जाऊन त्यालाही भिक्षु होण्यास आग्रह करूं लागला.  तेव्हा भद्दिय म्हणाला, ''तूं सात वर्षे थांब मग आपण भिक्षु होऊं.'' पण इतकीं वर्षे अनुरुद्ध वाट पाहण्याला तयार नव्हता.  सहा वर्षे, पांच वर्षे, चार, तीन, दोन, एक वर्ष, सात माहिने, असें करतां करतां भद्दिय सात दिवसांनीं अनुरुद्धाबरोबर जाण्यास कबूल झाला.  आणि सात दिवसांनंतर भद्दिय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किम्बिल व देवदत्त हे सहा शाक्यपुत्र आणि त्यांच्याबरोबर उपालि नांवाचा न्हावी असे सात असामी चतुरंगिनी सेना सज्ज करून त्या सेनेसह कपिलवस्तूपासून दूर अंतरावर गेले; व तेथून सैन्य मागे फिरवून त्यांनी शाक्य देशाची सीमा उल्लंघिली.  त्या वेळीं भगवान् मल्लांच्या अनुप्रिय नांवाच्या गावीं राहत होता.  तेथे जाऊन या सात असामींनी प्रव्रज्या घेतली.

भद्दियाच्या कथेवरून निघणारा निष्कर्ष


बुद्ध भगवंताची कीर्ति ऐकून पुष्कळ शाक्य कुमार भिक्षु होऊं लागले; आणि तोंपर्यंत शाक्यांच्या गादीवर भद्दिय राजा होता.  मग शुद्धोदन राजा झाला कधी ?  शाक्यांच्या राजाला सगळे शाक्य एकत्रित होऊन निवडीत असत, किंवा त्याची नेमणूक कोसल महाराजाकडून होत असे, हें सांगता येत नाही.  शाक्यांनी जर त्याची निवड केली म्हणावी, तर त्यांना त्याच्यापेक्षा वडील महानाम शाक्यासारख्या एखादा शाक्य सहज निवडतां आला असता.  या शिवाय अंगुत्तरनिकायाच्या पहिल्या निपातांत, उच्च कुलांत जन्मलेल्या माझ्या भिक्षुश्रावकांत कालिगोधेचा पुत्र भद्दिय श्रेष्ठ आहे, असें बुद्धवचन सापडतें.  केवळ उच्च कुळांत जन्मल्याने शाक्यांसारखे गणराजे भद्दियाला आपला राजा करतील हें संभवनीय दिसत नाही.  कोसल देशाच्या पसेनदि राजाकडूनच त्याची नेमणूक झाली असावी, हें विशेष ग्राह्य दिसतें.  कांही झालें तरी शुद्धोदन कधीही शाक्यांचा राजा झाला नाही, असें म्हणावें लागतें.