भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


गोतम बोधिसत्त्व 3

भरण्डु-कालाम-सुत्तावरून होणारा उलगडा

या सुत्ताचें समग्र भाषांतर येथे दिलें आहे.  त्यावरून बुद्धचरित्रांतील दोन तीन गोष्टींचा चांगला उलगडा होतो.  त्यांत पहिली ही की, बुद्ध झाल्यानंतर भगवान गोतम मोठ्या भिक्षुसंघासह कपिलवस्तूला आला नाही; आणि त्याचा शाक्यांनी बहुमान केला नाही.  तो एकाकी आला; आणि त्याच्यासाठी योग्य जागा शोधण्याला महानामाला मोठा त्रास पडला.  शुद्धोदन राजाने जर बोधिसत्त्वासाठी तीन प्रसाद बांधले होते, तर त्यांपैकी एक खाली करून बुद्धाला कां देण्यांत आला नाही ?  शाक्यांचें कपिलवस्तूमध्ये एक संस्थागार (म्हणजे नगर-मंदिर) असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणीं सापडतो.  बुद्धाच्या उतार वयांत शाक्यांनी हें संस्थागार पुनः बांधलें, आणि त्यांत प्रथमतः बुद्धाला भिक्षुसंघासह एक रात्र राहावयास विनंती करून धर्मोपदेश करावयास लावलें.*  पण वरच्या प्रसंगीं बुद्धाला त्या संस्थागारांत राहण्यास मिळालें नाही.  म्हणजे बुद्ध शाक्यांपैकी एक सामान्य तरुण असून त्याची कपिलवस्तूंत फारशी महती नव्हती असें दिसतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  सळायतन संयुक्त, आसीविसवग्ग, सुत्त ६ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरी गोष्ट ही की, गोतमाने गृहत्याग करण्यापूर्वी कपिलवस्तूमध्ये हा कालामाचा आश्रम अस्तित्वांत होता.  कालामाचा धर्म जाणण्यासाठी त्याला मगधांच्या राजगृहापर्यंत प्रवास करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती.  कालामाचें तत्त्वज्ञान तो कपिलवस्तूमध्ये शिकला, हें या सुत्तावरूनच सिद्ध होतें.

तिसरी गोष्ट ही की, महानाम शाक्य बुद्धाचा चुलतभाऊ असता तर त्याची व्यवस्था त्याने भरण्डु कालामाच्या आश्रमांत न करतां आपल्या घराशेजारीं कोठे तरी प्रशस्त जागीं केली असती.  श्रमण गृहस्थाच्या घरीं तीन दिवसांच्यापेक्षा जास्त राहत नसत.  येथे तर एका रात्रीपुरतीच राहण्याची व्यवस्था पाहिजे होती; आणि ती देखील महानामाला आपल्या घरीं किंवा आपल्या अतिथिगृहांत करतां आली नाही.  एक तर महानामाचें घर अगदीच लहान असावें, किंवा बुद्धाला एक रात्र आश्रय देण्याचें त्याला कारण वाटलें नसावें.

या सर्व गोष्टींचा विचार केला असतां असें वाटतें की, महानाम शाक्य आणि भगवान् बुद्ध यांचा फार निकट संबंध नव्हता; आणि शुद्धोदन शाक्य तर कपिलवस्तूहून चौदा मैलांच्या अंतरावर राहत होता.  त्याचा आणि कपिलवस्तूचा फार थोडा संबंध असावा.  शाक्यांची सभा भरली, तरच तो कपिलवस्तूला जात असावा.

भद्दिय राजाची कथा

महापदानसुत्तांत शुद्धोदनाला राजा म्हटलें असून त्याची राजधानी कपिलवस्तु होती असें म्हटलें आहे.  परंतु विनयपिटकांतील चुल्लवग्गांत जी भद्दियाची कथा आली आहे, तिचा या विधानाशीं पूर्णपणें विरोध येतो.

अनुरुद्धाचा थोरला भाऊ महानाम पित्याच्या मरणानंतर घरची सर्व व्यवस्था पाहत असे.  अनुरुद्धाला प्रपंचाची माहिती मुळीच नव्हती.  बुद्ध भगवंताची सर्वत्र प्रसिद्धि झाल्यावर थोर थोर शाक्य कुळांतील तरुण भिक्षु होऊन त्याच्या संघांत प्रवेश करूं लागले.  हें पाहून महानाम अनुरुद्धाला म्हणाला, ''आमच्या कुळांतून एकही भिक्षु झाला नाही, तेव्हा तूं तरी भिक्षु हो, किंवा मी तरी भिक्षु होतों.''  अनुरुद्ध म्हणाला, ''मला हें काम झेपणार नाही; तुम्हीच भिक्षु व्हा.''