भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन धर्मिक परिस्थिति 8

असाच प्रसंग एकदा तेलंगस्वामीवर आला.  पोलीस स्वामीला घेऊन कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर गेल्याचें वर्तमान समजतांच त्यांचे शिष्य व चाहाते मोठमोठे पंडित व इतर वजनदान लोक साहेबाच्या बंगल्यावर गेले.  साहेबाने सर्वास बसवून घेऊन तेलंगस्वामीला प्रश्न केला, ''तुम्ही परमहंस आहांत काय ?''  स्वामीकडून 'होय' असें उत्तर मिळाल्यावर साहेबाने दुसरा प्रश्न केला, ''माझ्याकडचें अन्न खाल काय ?''  त्यावर स्वामी म्हणाले, ''तुम्ही माझें अन्न खाल काय ?''  ''मी जरी परमहंस नाही, तरी कोणाचेंही अन्न खातों,''  साहेबाने उत्तर केलें.

स्वामींनी तेथल्या तेथे आपल्या हातावर शौचविधि केला व तो हात पुढे करून स्वामी गोविंदसाहेबाला म्हणाले, ''हें घ्या माझें अन्न.  हें तुम्ही खाऊन दाखवा.''  साहेब अत्यंत कंटाळला आणि संतापून म्हणाला, '' हें काय माणसाने खाण्याजोगें अन्न आहे ?''  तेव्हा स्वामींनी तें पार खाल्लें आणि हात चाटून साफसूफ केला ?  साहेबाने स्वामीला सोडून दिलें, इतकेंच नव्हे, पण पुन्हा त्याची चौकशी देखील केली नाही !

मी १९०२ सालीं काशीला असतांना ही गोष्ट काशीच्या पंडितांनी मोठ्या आदराने सांगितलेली ऐकली आहे.  आणि त्यापूर्वी ती तशाच आदरबुद्धीने 'काशीयात्रा' या पुस्तकांत लिहिलेली मी वाचली.

आधुनिक तपस्या

हेच तेलंगस्वामी भर थंडीच्या दिवसांत केवळ डोकें वर ठेवून गंगेंत बसत; आणि भर उन्हाळ्यांत ज्या ठिकाणीं चालल्याने पायाला फोड येई, त्या गंगेच्या वाळवंटांत बसत.

लोखंडाच्या काट्यांची खाट बसवून त्याच्यावर निजणारे बैरागी पुष्कळांनी पाहिले असतील.  १९०२ सालीं असा एक बैरागी काशींत बिंदुमाधवाच्या मंदिराजवळ राहत होता.  लाकडाची लंगोटी घालून फिरणारे बुवाबैरागीही माझ्या पाहण्यांत आले आहेत.

श्रमणांचा तपश्चर्येविषयीं आदर

वर दिलेल्या तपश्चर्येच्या प्रकारांपैकी शाक, शामाक व अरण्यांतील सहज मिळालेली फळेंमुळें खाऊन राहणें, हा प्रकार अरण्यांत राहणारे ॠषिमुनि आचरीत असत.  ते वल्कलें नेसत आणि बहुतेक अग्निहोत्रही ठवेीत.  परंतु हे जे नवीन श्रमणसंप्रदाय निघाले त्यांनी अग्निहोत्राला फाटा दिला आणि अरण्यांत राहणार्‍या ॠषिमुनींच्या बर्‍याच तपश्चर्या घेऊन त्यांत चामड्याचे तुकडे वगैरे खाण्याच्या तपश्चर्यांची भर घातली.

बुद्धाच्या वेळीं निर्ग्रंथांचा (जैनांचा) संप्रदाय जोमांत होता हें वर सांगितलेंच आहे.  त्याशिवाय पूरणकाश्यप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन आणि संजय बेलवट्टपुत्त या पांच श्रमणनायकांचे श्रमणसंप्रदाय फार प्रसिद्ध होते.  या लोकांच्या तत्त्वज्ञानाचा विचार संक्षेपाने सातव्या प्रकरणांत केला आहे.  त्यावरून असें दिसून येईल की, तत्त्वाविषयीं त्यांचा फार मोठा मतभेद होता; तथापि दोन गोष्टींत त्यांची एकवाक्यता होती -

(१) या सर्वांना यज्ञयाग पसंत नव्हते, आणि
(२) तपश्चर्येविषयीं थोड्याबहुत प्रमाणांत त्यांचा आदर होता.