भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन धर्मिक परिस्थिति 6

जुगुप्सा

''आता माझी जुगुप्सा कशी होती हें सांगतों :-(नि) मी मोठ्या काळजीपर्वूक जात-येत असें.  पाण्याच्या थेंबावर देखील माझी तीव्र दया होती.  अशा विषम अवस्थेंत सापडलेल्या सूक्ष्म प्राण्याचा माझ्या हातून नाश होऊं नये, याबद्दल मी अत्यंत काळजी घेत असें. अशी माझी जुगुप्सा होती.''  (जुगुप्सा म्हणजे हिंसेचा कंटाळा.)

प्रविविक्तता


''हे सारिपुत्त, आता माझी प्रविविक्तता कशी होती हें सांगतों :- (इ) मी एखाद्या अरण्यांत राहत असतां कोणा तरी गुराख्याला, गवत कापणार्‍याला, लाकडें नेणार्‍याला किंवा जंगलाची देखरेख ठेवणार्‍या माणसाला पाहून गहन जंगलांतून, खोलगट किंवा सपाट प्रदेशांतून एकसारखा पळत सुटें. हेतु हा की, त्यांनी मला पाहूं नये आणि मी त्यांना पाहूं नये.  जसा एखादा अरण्यमृग मनुष्यांना पाहून पळत सुटतो, तसा मी पळत सुटत असें. अशी माझी प्रविविक्तता होती.''

विकट भोजन


(इ)  ''जेथे गाई बांधण्याची जागा असे व जेथून नुकत्याच गाई चरावयास गेलेल्या असत, तेथे हातापायांवर चालत जाऊन मी वासरांचें शेण खात असें.  जोंपर्यंत माझे मलमूत्र कायम असे, तोंपर्यंत त्यावर मी निर्वाह करीत होतों. असें माझें महाविकट भोजन होतें.''

उपेक्षा

(नि) ''मी एखाद्या भयानक अरण्यांत राहत असें.  जो कोणी अवीतरागी त्या अरण्यांत प्रवेश करी, त्याच्या अंगावर काटा उभा राहावयाचा, इतकें तें भयंकर होतें.  हिवाळ्यांत भयंकर हिमपात होत असतां मी मोकळ्या जागीं राहत होतों, आणि दिवसा जंगलांत शिरत होतों.  उन्हाळ्याच्या शेवटल्या महिन्यांत दिवसा मोकळ्या जागीं राहत असें, आणि रात्रीं जंगलांत शिरत असें.  मी स्मशानांत माणसांचीं हाडे उशाला घेऊन निजत असें.  गावढळ लोक येऊन माझ्यावर थुंकत, लघवी करीत, धूळ फेकीत अथवा माझ्या कानांत काड्या घालीत.  तथापि त्यांच्याविषयीं माझ्या मनांत कधीही पापबुद्धि उत्पन्न झाली नाही.